

पुणे: कोकण, मध्य महाराष्ट्रात सोमवार आणि मंगळवारी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मध्यप्रदेश आणि बिहार या राज्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्याचा परिणाम राज्याच्या हवामानावर दोन दिवस दिसणार आहे. त्यानंतर राज्यातील मोठा पाऊस कमी होणार आहे.
मान्सून अतिशय वेगाने यंदा जम्मू काश्मीर, लद्दाख या भागात पोहोचला आहे. साधारण तेथे तो 5 जुलैच्या सुमारास पोहोचतो. तसेच, राजधानी दिल्लीतही मान्सूनने रविवारी धडक मारली. त्यामुळे आता देशाचा 95 टक्के भाग व्यापला आहे. (Latest Pune News)
आता फक्त राजस्थान आणि हरियाणा राज्यात तो पोहोचणे बाकी आहे. मान्सूनचा जोर उत्तर भारतात वाढताच मध्यप्रदेश आणि बिहारला सोमवार, मंगळवारी रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होण्याची शक्यता आहे.
प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्राला सोमवार, मंगळवारी ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे दोन दिवस राज्यात मुसळधार ते मध्यम पाऊस होईल. फक्त मराठवाड्यात पावसाचा जोर कमी राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
26 नंतर राज्यात जोर वाढण्याची शक्यता
सध्या पावसाचा जोर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सातारा घाटमाथा या भागात असून 23 आणि 26 जून रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मात्र, इतर भागातील पाऊस कमी झाला आहे. राज्यात पुन्हा 26 जूनपासून मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे.