

मुंबई: राज्यातील एकाही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या उद्देशाने मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने राज्यभर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेअंतर्गत १७, १८ तसेच २४ आणि २५ ऑक्टोबर २०२६ रोजी राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
नागरिकांनी प्रारूप मतदार यादीतील आपले नाव तपासावे आणि आवश्यकतेनुसार नाव नोंदणी किंवा दुरुस्तीच्या अनुषंगाने २६ ऑक्टोबरपर्यंत विहित नमुन्यात ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील ३६ जिल्हा निवडणूक अधिकारी, २८८ मतदार नोंदणी अधिकारी, ७ हजार १०० सहायक मतदार नोंदणी अधिकारी आणि १ लाख २५३ केंद्रस्तरीय अधिकारी कार्यरत आहेत.
विशेष शिबिरांच्या दिवशी मतदान केंद्रांवर केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित राहून नागरिकांना मतदार नोंदणी, नावातील दुरुस्ती आणि इतर आवश्यक प्रक्रियांबाबत मार्गदर्शन व मदत करतील. मतदार यादीत नाव समावेशन करण्यासाठी अर्ज क्रमांक ६ भरता येतो.
मतदार यादीतील नाव वगळण्याची विनंती करण्यासाठी नमुना अर्ज क्रमांक ७ वापरावा. तसेच निवासस्थानातील बदल, मतदार यादीतील तपशिलात दुरुस्ती, नवीन मतदार ओळखपत्र मिळविणे किंवा दिव्यांग मतदार म्हणून नोंद करण्यासाठी नमुना अर्ज क्रमांक ८ भरता येईल.