

मुंबई : पाईप गॅस सुविधा (पीएनजी) उपलब्ध असलेल्या विभागातील रहिवाशांनी तीन महिन्यांच्या आत या गॅससाठी अर्ज करावेत; अन्यथा त्यांचा एलपीजी गॅस (सिलिंडर) बंद केला जाईल, असा इशारा अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिला.
जागतिक पातळीवर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन दरांवर परिणाम होत आहे; पण भारतातील गॅस व अन्नपुरवठा सुरळीत आहे. गॅस सिलिंडर बंद होणार असल्याच्या अफवा असून, नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये, असेही भुजबळ म्हणाले.
राज्यात 10 लाख 45 हजार पीएनजी ग्राहक आहेत; पण अनेकांनी याचा लाभ घेतलेला नाही. तीन महिन्यांत पाईपलाईनचे काम पूर्ण न झाल्यास एलपीजी बंद होणार नाही. मात्र, ज्यांनी पीएनजीसाठी अर्जच केला नसल्यास त्यांचा एलपीजी पुरवठा बंद होण्याची शक्यता आहे.
व्यावसायिक वापरासाठी पीएनजीचा 50 टक्के वापर वाढवण्याचा निर्णय घेतला जाणार असून, नैसर्गिक वायूचा साठा 2 लाख मेट्रिक टनांनी वाढवण्यात आला आहे.
दरम्यान, रेशनिंगबाबत तीन महिन्यांचे अन्नधान्य एकत्र घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच, रॉकेल वितरणही सुरू राहणार आहे, हा मुद्दा उच्च न्यायालयासमोर मांडण्यात आल्याचे भुजबळ म्हणाले.