

पुढारी ऑनलाईन डेस्क : विधान परिषदेच्या ११ जागांसाठीच्या निवडणुकीचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले. यात महायुतीचे सर्व ९ उमेदवार विजयी झाले. महाविकास आघाडीच्या प्रज्ञा सातव आणि उद्धव ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर विजयी झाले. पण शेकापचे जयंत पाटील पराभूत झाले. विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेसची सात मते फुटली. त्यामुळे महायुतीचे सर्व ९ उमेदवार निवडून आले. तर शरद पवार गटाचे पुरस्कृत उमेदवार शेकापचे जयंत पाटील यांचा अवघ्या बारा मतांनी पराभव झाला. जयंत पाटील यांच्या पराभवावर नेटकऱ्यांना X वर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Maharashtra MLC Election)
उबाठा गटाने दोस्तीत कुस्ती केली. मिलिंद नार्वेकर यांना उभे केले आणि जे शेवटी व्हायचे तेच झाले, असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे. जयंत पाटील यांनी लोकसभेला रायगडमध्ये अनंत गीते यांना सोडून तटकरे यांना मदत केली. त्यामुळे विधान परिषदेत जयंत पाटील यांचा गेम केला, असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे.
जर जयंत पाटील जिंकले असते तर महायुती खडबडून जागी झाली असती. त्यांना गाफील ठेवायला मुद्दाम पराभव केला. साहेबांचे राजकारण कळायला तुम्हाला साडेतीन जन्म लागतील, असेही एकाने म्हटले आहे.
रायगड लोकसभा निवडणुकीत महायुतीला केलेली मदत शेकापच्या जयंत पाटलांना भोवली. मिलिंद नार्वेकर यांना उभा केले तिथेच त्यांचा विजय डळमळीत झाला, असे एकाने पोस्टमध्ये म्हटले आहे.
जयंत पाटील लोकसभेला चुकलेच म्हणून त्यांना आता हे भोगावं लागलंय. पण रायगडमधील ६ विधानसभा मतदारसंघात या पराभवाचे खूप मोठे नुकसान महाविकास आघाडीला भोगावं लागणार आहे. कारण शेकापने रायगडमध्ये आपला पक्ष अजून जिवंत ठेवला आहे, असा दावा एका नेटकऱ्याने केला आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या निकालावर भाजपने प्रतिक्रिया दिली आहे. ''महाविकास आघाडीची ढोलकी वाजवणाऱ्या संजय राऊत यांनी आता शेकापच्या जयंत पाटील यांच्या पराभवावर बोलावं. पवार साहेबांनी एकीकडे जयंत पाटील यांना पाठिंबा दिल्यासारखं दाखवलं, दुसरीकडे नार्वेकरांना उभा केलं. खंजीर खुपसला गेलाय...तो कायमच खुपसला जाईल...यावेळी जयंत पाटील त्याचे बळी ठरले. आता राऊत कुणाचं समर्थन करणार? पाटलांना समर्थन देणाऱ्या पवारांचे की त्यांना पराभूत करणाऱ्या उद्धव ठाकरेंचे...!'' असे भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.