Vidhan Parishad Election : महायुतीचा दणक्यात विजय

विधान परिषद निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक 9, ‘मविआ’ला 2 जागा
Vidhan Parishad Election result
विधान परिषद निवडणुकीतील विजयी उमेदवार Pudhari File Photo

मुंबई : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी अतिशय चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत महायुतीचा दणक्यात विजय झाला. महायुतीने रिंगणात उतरविलेले सर्वच नऊ उमेदवार विजयी झालेे. महाविकास आघाडीतील शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाल्याने महायुतीने या निवडणुकीत महाविकास आघाडीला चित केल्याचे स्पष्ट झालेे. महायुतीच्या मतांना सुरुंग लावून महाविकास आघाडी आपले तीन उमेदवार निवडून आणेल, हे अंदाज फोल ठरवीत उलट महायुतीनेच महाविकास आघाडीच्या मतांना सुरुंग लावला असून, काँग्रेसची किमान सात मते फुटल्याचे स्पष्ट झाले आहे.

Vidhan Parishad Election result
Vidhan Parishad Election 2024 | किशोर दराडेंना महायुती, तर संदीप गुळवेंना आघाडी देणार साथ?

या निवडणुकीत महायुतीत भाजपच्या पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, परिणय फुके आणि सदाभाऊ खोत, शिवसेना (शिंदे) गटाच्या उमेदवार भावना गवळी आणि कृपाल तुमाने, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे शिवाजीराव गर्जे व राजेश विटेकर हे विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या प्रज्ञा सातव, शिवसेना (उबाठा) चे मिलिंद नार्वेकर यांचा विजय झाला. दुसर्‍या फेरीत मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यात लढत झाली. त्यात नार्वेकर विजयी झाले. विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेसची सात मते फुटली असून, त्यामुळे महायुतीचे सर्व 9 उमेदवार निवडून आले आहेत; तर शरद पवार गटाचे पुरस्कृत उमेदवार शेकापचे जयंत पाटील यांना अवघ्या बारा मतांसह पराभव पत्करावा लागला. शरद पवार गटाची 12 मते आणि विधानसभेतील शेकापचे एक मत, अशी 13 मते किमान पाटील यांना पडायला हवी होती; पण केवळ काँग्रेसचीच नव्हे, तर महाविकास आघाडीतील घटकपक्षांची मतेही फोडण्यात महायुतीला यश आले.

पवारांची जादू चालली नाही

विशेष म्हणजे, स्वतः शरद पवार यांनी शेकापचे जयंत पाटील यांना निवडून आणण्याची जबाबदारी शिरावर घेतली होती. मात्र, अजित पवार गटाचे किंवा महायुतीचे एकही मत त्यांना फोडता आले नाही. उलट महायुतीने काँग्रेसच्या सात मतांसह महाविकास आघाडीला खिंडार पाडले आहे. लोकसभा निवडणुकीत आघाडीने 31 जागा जिंकल्यामुळे त्यांच्या गोटात कमालीचा आत्मविश्वास होता; तर महायुतीचे आमदार फुटतील, असे आडाखे बांधले जात होते. त्यात स्वतः शरद पवार यांनी आपल्या गटाचा उमेदवार म्हणून जयंत पाटील यांना घोषित केले होते. अजित पवार गटाची मते ते फोडतील आणि अजित पवार गटाचा उमेदवार पडेल, असे बोलले जात होते. पवार यांनी आघाडीच्या मित्रपक्षांना स्वतः फोन केले होते; पण निकाल बघता पवार यांची ‘पॉवर’ या निवडणुकीत चाललेली नाही, असे स्पष्ट दिसते. जयंत पाटील यांना अवघी 12 मते मिळाली. शेकापचा नांदेडमध्ये एक आमदार आहे. त्यामुळे किमान 13 मते तरी पडायला हवी होती. त्यामुळे एक मत कोणाचे फुटले, शेकापचे की शरद पवार गटाचे, याबद्दल उलटसुलट चर्चा रंगली आहे.

भाजपकडे 103 आमदार आणि 7 अपक्ष अशी 110 मते आहेत; पण पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे या चार उमेदवारांना प्रत्येकी 26 मते पडून ते पहिल्या फेरीतच जिंकले. सदाभाऊ खोत यांना पहिल्या फेरीतच 14 मते मिळाली. चारही विजयी उमेदवारांची प्रत्येकी 3 अतिरिक्त अशी 12 मते खोत यांना मिळाली. त्यामुळे त्यांना 26 मतांसह पहिल्या फेरीतच विजय मिळाला.

अजित पवारांच्या उमेदवारांना पाच जादा मते

अजित पवार यांचा एक उमेदवार अडचणीत येईल, असे बोलले गेले; पण अजित पवार यांच्याकडे 40 मते आहेत त्यांच्यासोबत दोन अपक्ष आहेत. त्यांचे उमेदवार शिवाजीराव गर्जे 24 आणि राजेश विटेकर यांना 23 मते मिळाली. त्यांच्या दोन्ही उमेदवारांना मिळून 47 मते मिळाली. त्यांनी अपक्ष 2, समाजवादी 2, काँग्रेस 3 अशी सात मते अतिरिक्त मिळवली. त्याचबरोबर अजित पवार यांनी स्वतःच्या गटाचे आमदारही कायम राखले. त्यामुळे अजित पवार यांनी स्वतःच्या गटाचे दोन्ही आमदार निवडून आणण्यात यश मिळविले आहे. अजित पवारांनी आपले आमदार सोबत राखून शरद पवारांच्या रणनीतीला सुरुंग लावला.

शिंदे गटानेही 9 मते जादा मिळविली

शिंदे गटाकडे 38 मते आहेत. त्यांच्या भावना गवळी 24 आणि कृपाल तुमाने 25 अशी एकूण 49 मते पडली. त्यामुळे शिंदे यांनी बच्चू कडू 2, मनसे 1, एमआयएम 2, अपक्ष चार अशी 9 मते अतिरिक्त मिळविली आहेत. यातील बहुतांश हे पहिल्यापासूनच शिंदे यांच्या सोबत आहेत. पहिल्या फेरीत मिलिंद नार्वेकर 22 आणि जयंत पाटील यांना 12 मते मिळाली. विजयासाठी 23 मतांची गरज असल्याने सहाव्या फेरीपर्यंत नार्वेकर यांचा 23 मतांचा कोटा पूर्ण झाला. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांची दुसर्‍या पसंतीची मते नार्वेकर यांना मिळाल्याने त्यांना 24.16 मते मिळाली; तर सहाव्या फेरीअखेर जयंत पाटील यांना 12.46 मते मिळाली आणि त्यांचा पराभव झाला.

नार्वेकरांना काँग्रेसची पाचच मते; सात मते फुटली

ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांना 22 मते मिळाली. ठाकरे गटाचे 15 आमदार आहेत. शंकरराव गडाख-अपक्ष, एक सीपीआय, अशी 17 मते त्यांच्याकडे होती. काँग्रेसकडे 37 मते आहेत. त्यांच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांना 28 मतांचा कोटा दिला होता; पण त्यांना 25 मतेच पडली. त्यामुळे या कोट्यातील काँग्रेसची तीन मते फुटली; तर काँग्रेस कोट्यातील 28 मते वगळून उर्वरित 9 मते नार्वेकर यांना देण्यात येणार होती; पण नार्वेकर यांना काँग्रेसची 5 मतेच मिळाली. त्यामुळे त्यांची 17 अधिक काँग्रेसची 5 अशी त्यांना 22 मते मिळाली. येथेही काँग्रेसची 9 पैकी 4 मते फुटली. त्यामुळे काँग्रेसची एकूण सात मते फुटल्याचे स्पष्ट झाले. झिशान सिद्दीकी, सुलभा खोडके, हिरामण खोसेकर यांची मते अजित पवार गटाने खेचली; तर खा. अशोक चव्हाण समर्थक चार आमदारांचीही मते फुटली. त्यामुळे काँग्रेसची एकूण सात मते फुटल्याचे स्पष्ट झाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news