

नवी मुंबई : पर्यटन क्षेत्रात महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन विभागाने सुरू केलेली महिला-केंद्रित ‘आई’ पर्यटन योजना ही महिलांसाठी सुवर्णसंधी ठरणार असल्याचे प्रतिपादन पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक डॉ. प्रज्ञा मनोहर यांनी केले. भास्करवाडी, पालघर येथे पालघर डिस्ट्रिक्ट टुरिझम डेव्हलपमेंट वेल्फेअर असोसिएशनच्या सदस्यांसोबत आयोजित चर्चासत्रात त्या बोलत होत्या.
31 जानेवारी 2026 रोजी आयोजित या चर्चासत्रात पर्यटन विभागाच्या ‘आई’ महिला-केंद्रित पर्यटन धोरणाची सविस्तर माहिती देण्यात आली. पर्यटन क्षेत्रात महिला उद्योजकांनी अधिकाधिक सहभाग नोंदवून स्वतःचा व्यवसाय उभारावा व या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
‘आई’ पर्यटन धोरणांतर्गत महिला उद्योजकांना पर्यटनाशी संबंधित व्यवसाय सुरू करण्यासाठी अधिकृत बँकेकडून रुपये 15 लाखाच्या मर्यादेत कर्ज मंजूर झाल्यास, त्या वरील व्याजाचा परतावा पर्यटन संचालनालयामार्फत देण्यात येणार आहे. हा व्याज परतावा 12 टक्क्यांच्या दराने किंवा कमाल रुपये 4.50 लाखांपर्यंत अथवा कर्ज कालावधी 7 वर्षे पूर्ण होईपर्यंतयापैकी जे आधी घडेल त्या निकषांनुसार अदा करण्यात येणार आहे.
या योजनेमुळे महिला उद्योजकांना पर्यटन क्षेत्रात आर्थिक पाठबळ मिळणार असून, महिलांच्या सक्षमीकरणाबरोबरच स्थानिक पर्यटन उद्योगालाही चालना मिळण्यास मदत होणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.अधिक माहितीसाठी इच्छुक महिला उद्योजकांनी विभागीय पर्यटन कार्यालय, कोकण भवन येथे प्रत्यक्ष भेट देऊन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पर्यटन विभागामार्फत करण्यात आले आहे.