Stock Market Crash
Stock Market CrashPudhari

Stock Market Today: सेन्सेक्स–निफ्टीत मोठी घसरण; IT शेअर्स कोसळले, गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी बुडाले

Stock Market Today: जागतिक बाजारातील मोठ्या विक्रीमुळे भारतीय शेअर बाजारात आज जोरदार घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स सुमारे 700 अंकांनी घसरला, तर निफ्टीत जवळपास 1 टक्क्यांची घसरण झाली.
Published on

Stock Market Today: जागतिक बाजारात सुरू असलेल्या जोरदार विक्रीचा फटका आज भारतीय शेअर बाजारालाही बसला. सकाळपासूनच सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक घसरणीसह उघडले. सेन्सेक्स सुमारे 700 अंकांनी खाली होता, तर निफ्टीत जवळपास 1 टक्क्यांची घसरण झाली होती.

या घसरणीचं मुख्य कारण IT क्षेत्रातील मोठी घसरण आहे. जागतिक पातळीवर टेक शेअर्समध्ये विक्रीचा सपाटा सुरू असून त्याचा परिणाम भारतीय IT शेअर्सवरही झाला. अनेक IT शेअर्स तब्बल 5 टक्क्यांपर्यंत घसरले, ज्यामुळे संपूर्ण बाजार हादरला.

सलग दोन दिवसांत गुंतवणूकदारांचे जवळपास 10 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बुधवारी बाजार सकारात्मक बंद झाला होता आणि त्यावेळी BSE चे एकूण मार्केट कॅप सुमारे 474 लाख कोटी रुपये होते. मात्र आता ते घसरून सुमारे 465 लाख कोटी रुपयांपर्यंत आले आहे.

जिओजित इन्व्हेस्टमेंटचे चीफ इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजिस्ट व्ही. के. विजयकुमार यांच्या मते, सध्या शेअर बाजार अस्थिर टप्प्यात प्रवेश करत आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीती निर्माण होऊ शकते, पण त्याच वेळी चांगल्या संधीही आहेत.

ते म्हणाले, अमेरिकेतील AI शेअर्समध्ये विक्री होणार हे अपेक्षितच होतं, मात्र ती नेमकी कधी आणि किती मोठ्या प्रमाणात होईल, याचा अंदाज नव्हता. Nasdaq मध्ये 2.04 टक्क्यांची घसरण झाली असली, तरी याला ‘क्रॅश’ म्हणता येणार नाही. मात्र ही घसरण कायम राहिली, तर अमेरिकन बाजारात आणखी घसरण होऊ शकते.

भारताच्या दृष्टीने पाहिलं, तर जागतिक AI ट्रेडमधील माघार (ज्यात भारतीय बाजार गेल्या वर्षी फारसा सहभागी नव्हता) पुढे जाऊन फायदेशीर ठरू शकते. पण सध्या भारतीय बाजाराला सर्वाधिक धक्का IT शेअर्समधील मोठ्या विक्रीमुळे बसत आहे.

IT हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे नफा देणारे सेक्टर आहे. ‘Anthropic shock’ चा IT क्षेत्रावर नेमका काय परिणाम होईल, हे अजून स्पष्ट नाही. अशा वेळी घाईघाईने शेअर्स विकणं योग्य ठरणार नाही. गुंतवणूकदारांनी थोडं थांबून परिस्थिती स्पष्ट होऊ द्यावी, असा सल्ला विजयकुमार यांनी दिला.

Stock Market Crash
IT Salary 2026: TCS, Infosysमध्ये इंजिनिअर्सना कमी पगार का मिळतोय? एक्सपर्ट्सनी सांगितलं धक्कादायक कारण

त्यांच्या मते, सध्याच्या परिस्थितीत चांगल्या दर्जाच्या ग्रोथ स्टॉक्समध्ये गुंतवणूक करता येऊ शकते. विशेषतः ज्या कंपन्यांनी Q3 मध्ये चांगले निकाल दिले आहेत. तसेच ऑटो सेक्टर मात्र तुलनेने मजबूत राहण्याची शक्यता आहे, कारण या क्षेत्रात कमाई आणि वाढीचा वेग चांगला आहे.

दरम्यान, जागतिक बाजारांकडूनही फारसा दिलासा मिळत नाहीये. अमेरिकेत AI संबंधित चिंता वाढल्यानंतर आशियाई बाजारही घसरले. S&P 500 सलग तिसऱ्या दिवशी घसरला आहे. जपानचा Nikkei 225 सुमारे 1.69 टक्क्यांनी, दक्षिण कोरियाचा KOSPI 0.5 टक्क्यांनी आणि ऑस्ट्रेलियाचा ASX 200 निर्देशांक 1.3 टक्क्यांनी घसरला.

Stock Market Crash
Bangladesh Election: बांग्लादेशात 20 वर्षानंतर BNP पक्षाला बहुमत; पंतप्रधान होणारे तारिक रहमान कोण?

गुरुवारी अमेरिकन बाजारात टेक शेअर्समधून मोठ्या प्रमाणावर पैसे बाहेर काढण्यात आले. त्याच वेळी आर्थिक आकडे आणि कंपन्यांचे निकाल पाहत गुंतवणूकदार सावध झाले. परिणामी S&P 500 मध्ये 1.57%, Nasdaq मध्ये 2.03% आणि Dow Jones मध्ये 1.34% घसरण झाली. IT शेअर्सवरील दबाव आणि जागतिक अनिश्चित वातावरणामुळे, शेअर बाजारात घसरण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news