Tier 2 Cities Housing: टियर-2 शहरांतील घरविक्रीत 10% घसरण; 2025 मध्ये विक्री 1.56 लाखांवर
मुंबई : गत कॅलेंडर वर्षात (2025) देशातील 15 टियर-2 शहरातील घरांची विक्री 10 टक्क्यांनी घटून 1.56 लाखांवर आली आहे. या शहरातील बांधकाम क्षेत्राची उलाढाल मात्र 1.48 लाख कोटी रुपयांवर स्थिर राहिली आहे.
प्रॉप इक्विटीने दिलेल्या आकडेवारीनुसार अहमदाबाद येथील घरांची विक्री 8 टक्क्यांनी घसरून 51 हजार 148वर आली आहे. कॅलेंडर वर्ष 2024मध्ये येथे 55 हजार 315 घरांची विक्री झाली होती. सुरत येथील घरांची विक्री 15 टक्क्यांनी घटून 19 हजार 835वर आली आहे. कॅलेंडर वर्ष 2024मध्ये 23 हजार 342 घरांची विक्री झाली होती. वडोदरा येथील घरांची विक्री 17 हजार 45वरून 13 हजार 798वर आली आहे. गांधीनगर येथील घरांच्या विक्रीतही 13 हजार 884 वरून 13 हजार 710वर घट झाली आहे.
नाशिक येथील घरांची विक्री 12 हजार 492 वरून 11 हजार 188वर खाली आली आहे. नाशिक येथील घरांच्या विक्रीत जवळपास 10 टक्क्यांनी घसरण झाली आहे. नागपूर येथील घरांच्या विक्रीत 7,653 वरून 6,260 पर्यंत घसरण झाली आहे. येथील घरांची विक्री 18 टक्क्यांनी घटली आहे. भुवनेश्वर येथील घरांची विक्री 25 टक्क्यांनी घटून 4,885वर आली आहे. कॅलेंडरवर्ष 2024मध्ये 6,538 घरांची विक्री झाली होती.
जयपूर येथील घरांची विक्री 10,271 वरून 9,758वर आली आहे. गोव्यातील घरांची विक्री 3 हजार 518 वरून 3,507 झाली आहे. कोइम्बतूर, भोपाळ, विशाखापट्टणम येथील घरांची विक्रीही घसरली आहे. केवळ मोहाली येथील घरांची विक्री 34 टक्क्यांनी वाढून 6 हजार 118वर गेली आहे. कॅलेंडर वर्ष 2024मध्ये 4,554 घरांची विक्री झाली होती.

