

Kishori Pednekar on Mumbai Mayor Election
मुंबई : मुंब महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत मोठी घडामोड समोर आली आहे. ठाकरे गटाने (शिवसेना उबाठा) या निवडणुकीत कोणताही उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. 'मातोश्री'वर झालेल्या बैठकीनंतर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी ही भूमिका स्पष्ट केली.
माध्यमांशी बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, "मुंबईचा महापौर मराठी माणूस होत असेल, तर आम्ही त्यात कोणताही अपशकुन करणार नाही. मराठी माणूस जिंकला आहे, हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. भलेही आकड्यांचे गणित आमच्या बाजूने नसेल, तरीही बाळासाहेब ठाकरेंनी जो मराठी अस्मितेचा झेंडा मुंबईत लावला आहे, तो कायम राखणे आमचे कर्तव्य आहे."
ठाकरे गट मुंबईच्या प्रश्नांवर आक्रमक राहणार असल्याचे पेडणेकर यांनी स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून महापालिकेत काम करू. कोणत्याही आमिषाला किंवा दबावाला बळी न पडता मुंबईकरांचे प्रश्न मांडू. सत्ताधारी पक्षाकडून होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना आम्ही घाबरत नाही. ज्यांना आमची प्रकरणे काढायची आहेत, त्यांनी खुशाल काढावीत, आम्ही समोर उभे आहोत.
संजय राऊत यांनी 'भाजपचा महापौर होणे हा काळा दिवस ठरेल' असे विधान केले होते. त्यावर पेडणेकर म्हणाल्या की, राऊत यांनी त्यांच्या सूचक वाक्यातून भविष्यातील परिस्थितीकडे लक्ष वेधले आहे. वर्तमान आणि भूतकाळ आम्ही जपला आहे, पण येणारा भविष्यकाळ कसा असेल, हे जनतेला लवकरच समजेल.
ठाकरे गटाच्या या भूमिकेचे सत्ताधारी गटाने स्वागत केले आहे. किशोरी पेडणेकर यांच्या अनुभवाचा आदर केला जाईल आणि विरोधी पक्ष म्हणून त्यांनी मांडलेल्या विधायक सूचनांकडे सकारात्मकतेने पाहिले जाईल, अशी प्रतिक्रिया सत्ताधारी प्रतिनिधींनी दिली आहे. "आम्ही सर्वांना सोबत घेऊन मुंबईकरांच्या विकासासाठी काम करू," असेही त्यांनी नमूद केले.