Mumbai Mayor Election 2026: मुंबई महापौर पदासाठी भाजपाकडून रितू तावडे, उपमहापौर पदासाठी शिंदे गटाचे संजय घाडी

११ फेब्रुवारी रोजी महापौर आणि उपमहापौर निवडणूक पार पडणार आहे.
Mumbai Mayor Election 2026: मुंबई महापौर पदासाठी भाजपाकडून रितू तावडे, उपमहापौर पदासाठी शिंदे गटाचे संजय घाडी
Published on
Updated on

मुंबई : तब्बल चार वर्षांनंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पार पडल्यानंतर आता मुंबई महापौर ११ फेब्रुवारी रोजी ठरणार आहे. यासाठी भारतीय जनता पार्टीकडून महापौर पदासाठी रितू तावडे यांनी अर्ज दाखल केला. तर उपमहापौर पदाकरिता शिंदे गटाचे नगरसेवक संजय घाडी यांनी अर्ज भरला. आता बुधवार, ११ फेब्रुवारी रोजी महापौर आणि उपमहापौर निवडणूक पार पडणार आहे.

मुंबई महापालिका मुख्यालयातील सचिव विभागात शनिवारी सकाळी ११.३० वाजता महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज भरण्यात आले. तर उबाठाकडून अद्यापही कुणाचाही अर्ज दाखल करण्यात आलेला नसून आज मातोश्री येथे सर्व नगरसेवकांची बैठक बोलविण्यात आली असून यानंतरचं उबाठाची भूमिका समोर येवू शकेल.

सव्वा वर्षांसाठी उपमहापौर पद

शिंदे गटाकडून पक्ष श्रेष्ठीने उपमहापौर पद हे सव्वा वर्षांपर्यंतचे ठेवले आहे. भाजपाने मात्र अद्यापही महापौर पदाबाबत असा कुठलाही कालावधी ठरविलेला नाही. मात्र अडीच वर्षांनंतर महापौर पदाचे आरक्षण सोडतीनुसार भाजपा आपला उमेदवार बदलू शकतो, हे ठरले आहे.

अशी होणार निवडणूक

मुंबईचे महापौर पद सर्वसामान्य महिलांसाठी राखीव झाल्यामुळे महापालिका सचिव विभागाने ११ फेब्रुवारी २०२६ रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. ही निवडणूक प्रक्रिया दुपारी बारा वाजता सुरू करण्यात येणार असून यावेळी पिठासीन अधिकारी म्हणून महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी राहणार आहेत. पिठासीन अधिकाऱ्यांनी महापौर पदासाठी असलेल्या उमेदवारांची नावे पुकारल्यानंतर नगरसेवकांना आपले मत हात वर करून नोंदवावे लागणार आहे. त्यानंतर ज्या उमेदवाराला मत द्यायचं आहे त्या उमेदवाराच्या समोर असलेल्या रखान्यामध्ये त्या नगरसेवकाला स्वाक्षरी करावी लागणार आहे. या सर्व प्रक्रियेला सुमारे तासाभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

महापौर यांची निवड झाल्यानंतर नवनियुक्त महापौरांच्या अध्यक्षतेखाली उपमहापौर यांची निवडणूक प्रक्रिया महापौर प्रमाणेच पार पाडण्यात येणार आहे. या प्रक्रियेलाही सुमारे एक तासाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर समिती सदस्यांची नियुक्ती ही याचवेळी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याशिवाय सभागृह नेते विरोधी पक्षनेते यांची घोषणाही याचवेळी होणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

महापालिकेतील पक्षीय नगरसेवकांचे संख्याबळ

भारतीय जनता पार्टी - ८९

शिवसेना (उबाठा) - ६५

शिवसेना (शिंदे गट) - २९

काॅॅंग्रेस पार्टी - २४

एमआयएम - ८

महाराष्ट्र नवनिर्माण सेना - ६

राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी - ३

समाजवादी पार्टी - २

राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी (श.प) - १

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news