

मुंबई: जुहू परिसरात बीएमडब्ल्यू कारने धडक दिल्यानंतर वाहतूक पोलिसाच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न करून घटनास्थळावरून पळ काढणाऱ्या महिला चालकाला जुहू पोलिसांनी अटक केली.
अपघात करणाऱ्या महिलेला वाहतूक पोलिसाने वाहन बाजूला घेण्यास सांगितल्यावर संबंधित महिलेने पोलीसाला ‘कितना पैसा चाहिए’ विचारणा केली. महिलेने पोलीसाला न जुमानता कार वेगाने चालवत घटनास्थळावरुन पलायन केले.
जुही मेहता असे या महिलेचे नाव असून, ती मुंबईतील एका डिजिटल मीडिया आणि कंटेंट कॉमर्स कंपनीची मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहे. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्यावेळी सांताक्रूझ वाहतूक विभागाचे पोलीस शिपाई प्रशांत गोपाळ हाके कर्तव्यावर होते. त्यांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही वाहनचालकांना वाहने बाजूला घेण्यास सांगितल्यावर महिला चालकाने त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.
समाज माध्यमांवर महिलेने मांडली बाजू
जुही मेहता हिने समाजमाध्यमांवर व्हिडीओ प्रसिद्ध करून आपली बाजू मांडली आहे. दुचाकीवरील महिला आपल्या दिशेने आली होती आणि तिला वॅगनआरची धडक बसली, असा दावा तिने केला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची ३५ मिनिटांहून अधिक वेळ वाट पाहिली; मात्र गर्दी वाढल्याने आणि आपण एकटी असल्याने तेथून निघून गेल्याचेही तिने म्हटले आहे.
गुन्हा दाखल, अटक आणि जामीन
वाहतूक पोलीस शिपाई प्रशांत हाके यांच्या तक्रारीवरून जुहू पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १३२, १२५, ३५१(२) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी जुही मेहता हिला अटक केली. मद्यप्राशन केले होते का, हे तपासण्यासाठी तिची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली.
शनिवारी वांद्रे न्यायालयाने तिला रोख जामिनावर मुक्त केले. दरम्यान, वाहतूक विभागाने अपघात करून घटनास्थळावरून पळ काढल्याप्रकरणी तिच्या बीएमडब्ल्यूला ई-चलनही जारी केले आहे.
खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची पोलिसालाच धमकी
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हाके यांनी कार थांबविण्यास सांगितल्यानंतर महिलेने 'कितना पैसा चाहिए?' असा सवाल केला. पोलीस शिपाई कारसमोर उभे राहून तिला थांबण्यास सांगत असतानाही तिने कार पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हाके यांना बाजूला व्हावे लागले.
त्यानंतर तिने कार वेगाने पुढे नेत घटनास्थळावरून पळ काढला. महिलेने आपल्याला अपहरण करण्याची आणि महिलांसंबंधी खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याचे हाके यांनी तक्रारीत म्हटले आहे.