

नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेकडून मुख्य जलवाहिन्यांवर विविध ठिकाणी व्हॉल्व्ह बसविण्याची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामांसाठी मंगळवारी सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे-सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली या विभागांतील बंद ठेवण्यात येणार आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सानपाडा, वाशी, बेलापूर आणि शिरवणे परिसरातील मुख्य जलवाहिन्यांवर विविध तांत्रिक कामे केली जाणार आहेत. सानपाडा मोराज सर्कलजवळील मुख्य जलवाहिनीवर ४०० मिमी व्यासाचा बटरफ्लाय व्हॉल्व्ह, तर सानपाडा सेक्टर ३० येथील सामाना प्रेसजवळील जलवाहिनीवर २५० मिमी व्यासाचा स्लुईस व्हॉल्व्ह बसविण्यात येणार आहे.
वाशी सेक्टर १९ येथील सतरा प्लाझा जवळील मुख्य जलवाहिनीवर २५० मिमी व्यासाचा स्लुईस व्हॉल्व्ह, तर सेक्टर २२ येथील मुख्य जलवाहिनीवर ७०० मिमी व्यासाचा बटरफ्लाय व्हॉल्व्ह बसविण्याचे काम होणार आहे.
बेलापूर सेक्टर २८ येथील पंपहाऊसला जोडणाऱ्या ७०० मिमी व्यासाच्या इनलेट जलवाहिनीवर तसेच सेक्टर १५ येथील किल्ला जंक्शनजवळील मुख्य जलवाहिनीवरही बटरफ्लाय व्हॉल्व्ह बसविण्यात येणार आहेत.
आवश्यक पाणीसाठी करण्याचे आवाहन
या कामांमुळे मंगळवारी सकाळी १० ते रात्री ८ या कालावधीत नवी मुंबईसह सिडको क्षेत्रातील खारघर आणि कामोठे नोडमधील पाणीपुरवठाही बंद राहणार आहे. बुधवारी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा व आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन पालिकने केले आहे.