

जोगेश्वरी : जोगेश्वरी पूर्वेतील इंदिरानगरमध्ये एसआरए प्रकल्पाच्या नावाखाली सुरू असलेला ‘ग्रीन झोन डेव्हलपर’च्या विकासकाविरोधात रहिवाशी आक्रमक झाले आहेत. रहिवाशांसह कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रकल्पस्थळी सुरक्षेचे नियम पायदळी तुडवत असलेल्या विकासकामुळे एका मजुराचा जीव थोडक्यात बचावला. या घटनेमुळे इंदिरानगरच्या रहिवाशांनी मेघवाडी पोलीस स्टेशनवर सोमवारी धडक मोर्चा काढून विकासकावर कारवाई करण्याची मागणी केली.
रविवारी इंदिरानगर भागात काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. ग्रीन झोन डेव्हलपरच्या साईटवरून सहाव्या मजल्यावरून 10 ते 15 सिमेंटचे अवजड ब्लॉक्स थेट खाली कोसळले. यामध्ये खाली काम करणारा मजूर गंभीर जखमी झाला. सुदैवाने हे ब्लॉक्स त्याच्या डोक्यावर न पडता मानेवर पडले, नाहीतर तिथेच मोठा अनर्थ घडून जागीच मजुराचा जीव गेला असता.
धक्कादायक म्हणजे, मजुरांकडे कोणतीही सुरक्षा साधने नव्हती. ‘इंदिरानगर सामाजिक विकास संस्थे’च्या पदाधिकाऱ्यांनी आणि रहिवाशांनी तत्परता दाखवत जखमीला ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
या घटनेनंतर संतप्त रहिवाशांनी मेघवाडी पोलीस स्टेशनवर सोमवारी धडक मोर्चा नेला. पोलिसांनीही या घटनेची त्वरित दखल घेत रात्रीच घटनास्थळी जाऊन पंचनामा करून तपास सुरू केला आहे.
‘ग्रीन झोन डेव्हलपर’च्या प्रकल्पस्थळी रात्री 2-2 वाजेपर्यंत बेकायदेशीर काम करणे, सुरक्षेचे नियम न पाळणे, रहिवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य न देणे या प्रकारामुळे रहिवाशांनी मेघवाडी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला. संबंधित विकासक नियमांचे उल्लंघन करून काम करत असल्यामुळे तत्काळ एसआरए प्रशासनाने बांधकामाला स्थगिती द्यावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.