

मुंबई : गोरेगावातील वीर सावरकर उड्डाणपुलाबाबत मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. हा उड्डाणपूल पाडण्याचा प्रस्ताव अखेर रद्द करण्यात आला आहे. मोनोपाईल (एकल स्तंभ) तंत्रज्ञानाच्या वापराने उड्डाणपुलाची पुनर्बांधणी करणे व्यवहार्य असल्याचा अहवाल आयआयटी मुंबईने मुंबई महानगरपालिकेला दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
2018 मध्ये सुमारे 27 कोटींचा खर्च करून हा पूल उभारला होता. मात्र वर्सोवा-दहिसर कोस्ल रोड, माइंडस्पेस दिंडोशी तसेच गोरेगाव-मुलुंड लिंक रोड या महत्त्वाच्या जोडमार्गांसाठी हा उड्डाणपूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधींनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला. त्यानंतर पालिकेने मोनोपाईल तंत्रज्ञानाचा पर्याय पुढे आणला.
डिसेंबर महिन्यात आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञ समितीने उड्डाणपुलाची प्रत्यक्ष पाहणी करत त्याची रचना, उंची, वळणक्षमता (टर्निंग रेडियस) आणि लांबीतील बदल शक्य आहेत का याचा सखोल अभ्यास केला. समितीने काही रचनात्मक सुधारणा सुचवून सुधारित आराखडे सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार कंत्राटदाराने सादर केलेल्या नव्या आराखड्यांना आता आयआयटी मुंबईची मान्यता मिळाली आहे. या नव्या आराखड्यानुसार उड्डाणपूल पाडण्याऐवजी मोनोपाईल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तो जतन केला जाणार आहे. त्यामुळे गोरेगावकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मोनोपाईल हे मजबूत पाया उभारण्याचे आधुनिक तंत्रज्ञान आहे. यामध्ये मोठ्या व्यासाचा प्रबलित काँक्रीटचा एकच खांब जमिनीत किंवा समुद्रात खोलवर रोवला जातो आणि त्यावर संपूर्ण पुलाचा भार घेतला जातो. मुंबईच्या दक्षिण भागातील कोस्टल रोड प्रकल्पात याच तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर करण्यात आला आहे.