

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीची निवडणूक 17 फेब्रुवारी होणार असून 16 सदस्यांची निवड केली जाणार आहे. त्यामध्ये भाजप 10 तर शिवसेना 6 सदस्य संख्या असणार आहे. नवी मुंबई भाजपने पक्षश्रेष्ठींकडे 27 नगरसेवकांची यादी पाठविली असून त्यापैकी 10 नगरसेवकांना पहिल्या टप्प्यात संधी मिळणार आहे.
सोमवारी दुपारी भाजप गटनेते सागर नाईक आणि भाजपच्या जेष्ठ नगरसेवकांची महापालिकेत बैठक झाली. या बैठकीत स्थायी समिती निवडीवर चर्चा झाली. महापालिका सचिवांसोबत चर्चा करून स्थायी समिती नावाची तारीख निश्चित केली जाणार आहे. स्थायी समिती निवडीसाठी कार्यक्रम पत्रिका तयार करण्यासाठी सात दिवसांचा कालवधी द्यावा लागतो. त्यानंतर सचिव अजेंड्यावर विषय घेतील.
पक्षश्रेष्ठींकडे 27 नगरसेवकांची यादी पाठविण्यात आली असून त्यापैकी 10 नगरसेवकांना पहिल्या टप्प्यात स्थायी समितीवर पाठवले जाणार आहे. ऐनवेळी नावात बदल होऊ शकतात. यासाठी सर्व विचारविनिमय करून स्थायी समितीची तारीख निश्चित केली जाईल, 15 ते 20 फेब्रुवारीपर्यंत ही निवड होईल असे भाजप नेते संजीव नाईक यांनी सांगितले.
मात्र स्थायी समितीच्या चाव्या भाजपच्या कोणत्या नगरसेवकाकडे असतील, म्हणजेच सभापतीपदी कुणाची वर्णी लागणार यावर बोलणे त्यांनी टाळले. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थायी समिती सभापतीपद दरवर्षी बदलण्याचा निर्णय पक्षाकडून घेतला असून पहिल्यांदा कोणत्या 16 सदस्यांची वर्णी लागणार, याकडे लक्ष लागले आहे.