

मुंबई: वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी ) जिओ वर्ल्ड प्लाझामध्ये संशयास्पद सरकारी ओळखपत्राचा वापर करून आणि बंदुकीसह सुरक्षा व्यवस्था भेदून प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार सोमवारी घडला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या याच ठिकाणी मंगळवारी झालेल्या कार्यक्रमाच्या एक दिवस आधीच ही घुसखोरी झाली. रोहन पारिख (२४) आणि त्याचा बॉडीगार्ड दिलीप कुंडे या दोघांना अटक करण्यात आली असून तिसऱ्या आरोपीचे नाव प्रथमेश गणेश बागुल आहे. पारिखसह दोघांना न्यायालयाने ११ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
थेट पीएमओचे ओळखपत्र
या तिघांपैकी एकाकडे बंदूक होती. सुरक्षा तपासणीत बंदूक आढळताच ओळखपत्राची पडताळणी केली असता त्यात विसंगती आढळल्या. रोहन पारिखकडील ओळखपत्रावर तो पीएमओ (PMO)मधील ‘ग्रेड सी अधिकारी’ असल्याचे नमूद आहेे. ओळखपत्रावर जारी केल्याची तारीख होती; परंतु वैधतेची तारीख नाही.
जारी करणाऱ्या अधिकाऱ्याची स्वाक्षरी असली तरी त्याचे पद नमूद नसल्याचे आढळले. पारिखच्या वकिलाने न्यायालयात वेगळी बाजू मांडली. पारिखला पीएमओतील नोकरीचे ऑफर लेटर, ओळखपत्र आणि पीएमओच्या अधिकार्यांची सही असलेली कागदपत्रे तरुण नावाच्या व्यक्तीने दिली.
पारिखने स्वतः ती कागदपत्रे, त्यासाठी झालेला पत्रव्यवहार तसेच संपर्क पोलिसांना सोपवला. पारिख स्वतः फसवणुकीचा बळी ठरला असण्याची शक्यता त्याच्या वकीलाने बोलून दाखवली. या दाव्याचीही स्वतंत्र पडताळणी पोलिसांकडून सुरू आहे.
पीएमओचा अधिकारी भासवणारा पारिख गणित आणि विज्ञान घेऊन बीएससी झालेला आहे. मात्र पीएमओतील नोकरीसाठी त्याने कुठलीही परीक्षा दिलेली नाही.
आरोपींनी संशयास्पद सरकारी ओळखपत्राचा वापर नेमका कशासाठी केला, ते कोणी तयार केले आणि अतिसंवेदनशील परिसरात प्रवेश करण्यामागे त्यांचा नेमका उद्देश काय होता, याचाही तपास सुरू आहे. जिओ वर्ल्ड प्लाझामधील सीसीटीव्ही फुटेज, आरोपींच्या हालचाली, त्यांच्यातील संपर्क तपासला जात आहे.
‘मोदींच्या दौऱ्याशी संबंध नाही’
मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन यांनी सांगितले की, तीन जणांनी बनावट सरकारी ओळखपत्राचा वापर करून बंदुकीसह मॉलच्या सुरक्षा व्यवस्थेतून जिओ वर्ल्ड प्लाझामध्ये प्रवेश केला. जप्त केलेले शस्त्र परवानाधारक असल्याचे निष्पन्न झाले आहे. हा प्रकार सोमवारी घडला मंगळवारी मुंबईत झालेल्या पंतप्रधानांच्या दौऱ्याशी या घटनेचा कोणताही संबंध नाही.