

मुंबई : मानवी कल्याणासाठी अणुऊर्जेचा वापर करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना ‘आयसोमेड’ प्रकल्पामुळे नवे बळ मिळाले आहे. 1974 मध्ये तुर्भे येथे सुरू झालेल्या या सुविधेचे आधुनिकीकरण करून उभारण्यात आलेल्या ‘आयसोमेड 2.0’ प्रकल्पामुळे निर्जंतुकीकरण प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुरक्षित झाली आहे.
बोर्ड ऑफ रेडिएशन अँड आयसोटोप टेक्नॉलॉजी (ब्रिट ) ही भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाची एक प्रमुख औद्योगिक घटक संस्था असून तिचे मुख्यालय नवी मुंबईतील तुर्भेत आहे. ही संस्था वैद्यकीय, कृषी, औद्योगिक आणि संशोधन क्षेत्रांसाठी रेडिओ-आइसोटोप, विकिरण तंत्रज्ञान उत्पादने आणि संबंधित सेवा पुरवते. एप्रिल 2025 पासून या केंद्राचे व्यावसायिक कामकाज पुन्हा सुरू झाले असून वैद्यकीय उपकरणे, कृषी उत्पादने आणि अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे. या प्रकल्पामुळे रुग्णालयांमधील संसर्ग कमी करण्यास मदत होणार आहे. तसेच कृषी क्षेत्रात अन्नप्रक्रिया आणि बियाण्यांच्या संरक्षणासाठीही या तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो. भारतीय बनावटीच्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय मानकांनुसार निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया उपलब्ध झाल्याने निर्यातीला चालना मिळण्याची शक्यता आहे.
भारत सरकारच्या पत्र सूचना कार्यालयाने (पीआयबी) माध्यम प्रतिनिधींना या केंद्राची भेट घडवून दिली. या वेळी उपसंचालिका जयदेवी
पुजारी यांनी सांगितले की, भाभा अणुसंशोधन केंद्र किंवा त्याच्याशी संबंधित ब्रिटसारख्या संस्था राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. येथे होत असलेले संशोधन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे यासाठी भेटी आयोजित केल्या जातात. 1974 मध्ये केवळ 12 उत्पादकांपासून सुरू झालेला हा प्रवास 1600 हून अधिक उत्पादकांपर्यंत पोहोचला असून ‘आयसोमेड 2.0’मुळे ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
वैद्यकीय उत्पादने, शस्त्रक्रियेची साधने, सिरिंज आणि इतर उपकरणे सूक्ष्मजीवमुक्त करण्यासाठी ‘गामा रेडिएशन’ ही पद्धत जागतिक स्तरावर अत्यंत प्रभावी मानली जाते. ‘आयसोमेड 2.0’मध्ये ‘कोबाल्ट-60’ या रेडिओआइसोटोपचा वापर करून उत्पादनांना किमान 25 किलो-ग्रे इतका किरणोत्सर्गाचा डोस दिला जातो. त्यामुळे निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया अचूक व सुरक्षित पार पडते.
या केंद्रात अद्ययावत ‘स्काडा’ आधारित नियंत्रण प्रणाली बसविण्यात आली आहे. त्यामुळे रेडिएशन स्रोताचे नियंत्रण आणि उत्पादनांची हालचाल अधिक सुरक्षित पद्धतीने करता येते. इंटरलॉक्स आणि आपत्कालीन स्वयंचलित यंत्रणेमुळे तांत्रिक बिघाड झाल्यास कर्मचाऱ्यांचे रेडिएशनपासून संरक्षण होते. या सुविधेला ‘करंट गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस’ आणि ‘आयएसओ 11137’ ही आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रे मिळाली आहेत.