

मुंबई : अमेरिकेने भारतावरील आयात शुल्क (ट्रम्प टॅरिफ) 50 वरून 18 टक्के केल्यानंतर मंगळवारी भारतीय शेअर बाजारात गुंतवणुकीची त्सुनामी आली. कापड, रसायने, ऑटो, बँक, आयटी, औषध, एफएमसीजी अशा जवळपास सर्वच क्षेत्रांतील कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाली. परिणामी, सेन्सेक्सने 2 हजार 72 आणि निफ्टी निर्देशांकाने 639 अंकांनी झेप घेतली. बीएसईतील गुंतवणूकदारांनी एका दिवसात 12 लाख कोटी रुपयांची कमाई केली; तर, रुपयाने डिसेंबर 2018 नंतरची एका दिवसातील सर्वोत्तम कामगिरीची नोंद करीत 90.26 पर्यंत मजल मारली.
मंगळवारचा दिवस शेअर बाजारासाठी तेजीचा आणि कमाईचा सुवर्ण दिवस ठरला असून गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले.
अमेरिकेच्या शुल्ककपातीनंतर मंगळवारी शेअर बाजारात गुंतवणुकीचा महापूर आला. मंगळवारी सकाळच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकात साडेचार ते पाच टक्क्यांची वाढ झाली. मुंबई शेअर बाजारात (बीएसई) सेन्सेक्सने 3,500 अंकांहून अधिक उसळी घेत 85,323 अंकांवर मजल मारली. राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) निफ्टी /...2
निर्देशांकाने 1,200 अंकांहून अधिक झेप घेत 26,308 अंकांवर मजल मारली होती. बाजार बंद होताना सेन्सेक्स 3.54 टक्क्यांच्या वाढीसह 83,739 आणि निफ्टी निर्देशांक 2.55 टक्क्यांच्या वाढीसह 25,727 अंकांवर स्थिरावला. अदानी पोर्ट्स, बजाज फायनान्स, इंडिगो, पावर ग्रीडच्या शेअरभावाने उसळी घेतल्याने सेन्सेक्सच्या वाढीला चालना मिळाली.
निफ्टी 50 निर्देशांकातील 46 कंपन्यांच्या शेअर भावात वाढ झाली. अदानी एंटरप्रायजेसच्या शेअरभावाने 10.40 टक्के, अदानी पोर्ट्स 9.12 आणि जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसने 8.15 टक्क्यांनी उसळी घेत सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. निफ्टीतील सर्व निर्देशांकांनी वाढ नोंदवली. निफ्टी रिअल्टी निर्देशांक चार टक्क्यांहून अधिक वधारला.
निफ्टी केमिकल, फार्मा, कंझ्युमर ड्युरेबल्स निर्देशांकाने तीन टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली. निफ्टी बँक, ऑटो, मेटल, पीएसयू बँक निर्देशांकातही अडीत ते तीन टक्क्यांची वाढ झाली. एनएसईतील 2 हजार 694 कंपन्यांच्या शेअर भावात वाढ झाली असून अवघ्या 534 कंपन्यांच्या शेअर भावात घट झाली, तर 90 कंपन्यांचे शेअर भाव टिकून होते.
बँकिंग, आयटी, ऑटो आणि मेटल क्षेत्रातील समभागांनी बाजाराला चालना दिली. मोठ्या कंपन्यांसोबतच मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही चांगली तेजी नोंदवली गेली.
आजच्या तेजीमुळे लाखो गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओची किंमत वाढली. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसह डे-ट्रेडर्सनाही आजचा दिवस फायदेशीर ठरला.
देशांतर्गत सकारात्मक आर्थिक संकेत, जागतिक बाजारातील मजबुती आणि परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची वाढती गुंतवणूक यामुळे बाजाराला बळ मिळाले.