

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये उमेदवारी नाकारल्यामुळे बंडखोरी करणाऱ्यांची समजूत काढण्यात राजकीय पक्षांना यश आले आहे. समजूत काढताना आपल्याला स्वीकृत नगरसेवक बनवण्यात येईल, असे गाजरही दाखवण्यात आले आहे. त्यामुळे आतापासूनच नाराजींनी नगरसेवक बघण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे.
मुंबई महानगरपालिकेतील नामनिर्देशित सदस्य म्हणजेच स्वीकृत नगरसेवकांची संख्या 10 झाल्यामुळे राजकीय पक्षातील प्रत्येक नाराजाला आपणच नगरसेवक होणार असे वाटत आहे. पण नगरसेवक बनण्यासाठी उत्सुक असलेल्या इच्छुकांची संख्या पाच डझनपेक्षा जास्त आहे.
त्यामुळे प्रत्येकाला स्वीकृत नगरसेवक बनवणे शक्यच नाही. त्यात अन्य पक्षातून आलेल्या काही माजी नगरसेवकांचेही राजकीय पुनर्वसन करावे लागणार आहे. त्यामुळे पक्षातील नाराजांना स्वीकृत नगरसेवक मिळेलच याची खात्री नाही.
उमेदवारी वाटपानंतर भाजपमध्ये माजी महापौर डॉ. शुभा राऊळ, मनसेच्या माजी नगरसेविका स्नेहल जाधव, सुधीर जाधव व अन्य माजी नगरसेवकाने प्रवेश केला आहे. त्यामुळे या माजी नगरसेवकांनाही स्वीकृत नगरसेवकपदाचे गाजर दाखवण्यात आले आहे.