

मुंबई : भांडुप रेल्वे स्टेशन पश्चिमेला झालेल्या जीवघेण्या अपघातानंतर इलेक्ट्रिक बस चालकांना विशेष प्रशिक्षण देण्याचा साक्षात्कार बेस्ट प्रशासनाला झाला आहे. या विशेष प्रशिक्षणामध्ये डिझेल बस आणि इलेक्ट्रिक बस चालवण्यामध्ये असलेल्या फरकाची जाणीव चालकांना करून दिली जाणार आहे.
बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागाचे खासगीकरण झाल्यापासून अपघाता वाढले आहेत. भांडुप पश्चिमेला बस मागे घेत असताना अपघात होऊन चार जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी झाले होते. या अपघातामागचे नेमके कारण आता समोर आले असून, त्यानंतर बेस्ट प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी व चालकांच्या प्रशिक्षणाबाबत अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पण प्रशासनाला हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे.
बस स्टार्ट करताना व थांबवताना कोणती काळजी घ्यावी, विशेषतः ड्राईव्ह आणि न्यूट्रल मोडबाबत अधिक सतर्क कसे राहावे, याचे धडे दिले जाणार असल्याचे बेस्टच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
इलेक्ट्रिक बस रस्त्यावर जाण्यापूर्वी त्या बसची तांत्रिक तपासणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या तपासणीमध्ये दोष आढळल्यास त्या बसला डेपोतून बाहेर काढण्यात येणार नाही. सर्व तपासणी केल्यानंतर बस चालण्यायोग्य असल्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच बस बाहेर काढण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत व चालकाच्या जबाबानुसार हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे नसून मानवी चूक व इलेक्ट्रिक बसच्या कार्यप्रणालीतील किचकट प्रक्रिया व चालकांना योग्य ज्ञान नसल्यामुळे झाल्याचे समोर आले आहे. बस चालकाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, चालकाला वाटले बस न्यूट्रल (एन) मोडवर आहे. प्रत्यक्षात बस ड्राईव्ह (डी) मोडवर होती. इलेक्ट्रिक बसला आवाज नसल्याने इंजिन चालू की बंद हे डिझेल बसप्रमाणे आवाजावरून समजत नाही. चालकाने न्यूट्रल समजून ॲक्सिलरेटरवर पाय ठेवताच, इलेक्ट्रिक बसच्या पिकअपमुळे ती अचानक वेगाने मागे गेली. चालकाचा बसवरील ताबा सुटल्यामुळे ती गर्दीत घुसली. यात निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला.