IIT Bombay: आयआयटी मुंबईचे नागपुरात ‘हब-अँड-स्पोक’ मॉडेल

देशभरातील नवउद्योजकांना मार्गदर्शन, गुंतवणूक आणि तंत्रज्ञानाच्या संधी उपलब्ध करून देणार
IIT Bombay
IIT BombayPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: देशातील स्टार्टअप आणि डीप-टेक उद्योगांना चालना देण्यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईच्या सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड आंत्रप्रेन्योरशिप (साइन) संस्थेने राष्ट्रीय स्तरावरील ‘हब-अँड-स्पोक’ उपक्रम सुरू केला आहे.

या उपक्रमाची पहिली सुरुवात नागपूरमधून करण्यात आली असून, देशभरातील शैक्षणिक संस्था, संशोधन केंद्रे आणि स्टार्टअप इनक्युबेटर्सना एका नेटवर्कमध्ये जोडण्याचे उद्दिष्ट आहे.

साइन संस्थेच्या दोन दशकांहून अधिक अनुभवाचा लाभ देशातील विविध संस्थांना मिळावा, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. आतापर्यंत स्टार्टअप्सना थेट मदत करणाऱ्या साइन संस्थेने आता अन्य संस्थांच्या स्टार्टअपविषयक क्षमता विकसित करण्यावरही भर दिला आहे. संस्थांमध्ये ज्ञानाची देवाणघेवाण, मार्गदर्शन आणि तंत्रज्ञानाधारित उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

IIT Bombay
Political News: एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवारांकडून शरद पवारांची भेट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून फोनवरून विचारपूस

या मॉडेलमध्ये साइन ही केंद्रीय ‘हब’ संस्था म्हणून काम करेल. स्टार्टअप इनक्युबेशन, व्यवस्थापन, मार्गदर्शन, गुंतवणूकदारांशी संपर्क आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय नेटवर्क उपलब्ध करून देण्याची जबाबदारी साइनकडे असेल. सहभागी संस्था ‘स्पोक’ म्हणून काम करतील. त्यांच्याकडील संशोधन सुविधा, प्रयोगशाळा, तज्ज्ञ मनुष्यबळ, उद्योजकता आणि स्थानिक उद्योगांशी असलेले संबंध यांचा उपयोग स्टार्टअप्सना होणार आहे.

नागपूरमध्ये १२ ऑक्टोबर रोजी विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (व्हीएनआयटी) येथे या उपक्रमांतर्गत बैठक झाली. यामध्ये १० शैक्षणिक संस्था आणि इनक्युबेशन संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. व्हीएनआयटी, आयआयएम नागपूर, एम्स नागपूर, आयआयआयटी नागपूर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयासह विविध संस्थांनी सहभाग घेतला.

IIT Bombay
MPSC Group C Recruitment 2026: एमपीएससी गट-क भरतीत मोठी वाढ; आता १६ हजार ७१७ पदांसाठी परीक्षा

या बैठकीत साइन आणि व्हीएनआयटी व्हेंचर्स व्हॉल्ट फाउंडेशन (व्ही३एफ) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. हब-अँड-स्पोक उपक्रमांतर्गत झालेली ही पहिली संस्थात्मक भागीदारी आहे.

स्टार्टअप्सना सह-इनक्युबेशन, गुंतवणूकदारांशी संपर्क, निधी मिळविण्यासाठी मार्गदर्शन, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, संशोधनाचे व्यावसायिकीकरण आणि उद्योगांशी जोडणी अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. डीप टेक, आरोग्य तंत्रज्ञान, कृषी, अन्नप्रक्रिया, उत्पादन, खाणकाम, पशुवैद्यकीय विज्ञान आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रांतही सहकार्याच्या संधी निर्माण केल्या जाणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.