

Devendra Fadnavis
मुंबई : दीर्घ मुदतीच्या व्हिसावर भारतात आलेल्या हिंदूंना देश सोडावा लागणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सोमवारी यासंदर्भातील संभ्रम दूर केला आहे.
पाकिस्तानातून दीर्घ मुदतीच्या व्हिसावर भारतात आलेल्या सिंधी हिंदू लोकांनी यापूर्वीच नागरिकत्वासाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे त्यांनी देश सोडण्याची गरज नाही. त्याचवेळी केंद्राच्या आदेशानुसार ज्यांनी भारत सोडायचा आहे, अशा सर्वांची ओळख पटली असून त्यांना देशाबाहेर जाण्यास फर्मावले आहे. संबंधित लोक कोणत्या मागनि बाहेर जात आहेत यावरही लक्ष ठेवण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना तातडीने देश सोडण्याचे निर्देश दिले.
त्यानंतर पाकिस्तानातून आलेले शरणार्थी हिंदू, सिंधी समाजाच्या नागरिकांच्या भवितव्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सिंधी समाजाच्या हिंदूंना देश सोडण्याचे काही कारण नसल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारने अल्पकालीन मुदतीच्या व्हिसावर भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत, तर वैद्यकीय व्हिसावर आलेल्या नागरिकांना २९ एप्रिलपर्यंत देश सोडण्याचे आदेश दिले होते. त्यासंदर्भात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सविस्तर खुलासा केला. देशाबाहेर गेलेल्या पाकिस्तानी नागरिकांची नेमकी संख्या लवकरच पोलिस खात्याकडून जाहीर केली जाईल, असेही ते म्हणाले.