

Maharashtra Weather Update
मुंबई, ठाण्यात बुधवारी पावसाचा जोर वाढला. दरम्यान, गोव्यासह महाराष्ट्र किनारपट्टी भागात पुढील ३ ते ४ दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
दरम्यान, मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने (आरएमसी), मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. ज्यात २८ मे रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण, गोव्यातील तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
गोव्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही ठिकाणी आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि गोव्यात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आज मान्सूनने महाराष्ट्राचा आणखी काही भाग, कर्नाटकचा उर्वरित भाग, तेलंगणाचा बहुतांश भाग, आंध्र प्रदेशचा उर्वरित भाग, छत्तीसगड आणि ओडिशाचा काही भाग, पश्चिम मध्य बंगालच्या उपसागराचा उर्वरित भाग व्यापला.
पुढील २ दिवसांत छत्तीसगड आणि ओडिशाचा काही भाग, ईशान्येकडील राज्यांचा काही भाग, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही भागात मान्सून दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, ओडिशाच्या किनाऱ्याजवळ वायव्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा कमी दाबाचा पट्टा पुढील २४ तासांत हळूहळू उत्तरेकडे सरकून उत्तर बंगालच्या उपसागरावर तीव्र कमी दाब क्षेत्रात (Depression) सक्रिय होण्याची शक्यता आहे. यामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.