

पुणे : राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांच्या बाधित क्षेत्राचा आकडा आणखी वाढून 40 हजार 949 हेक्टरवर पोहोचला आहे. त्यामध्ये उन्हाळी हंगामातील बहुतांश पिके शेतकर्यांच्या हातची गेली असून, हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अमरावती, बुलडाणा, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांना सर्वाधिक तडाखा बसल्याचे कृषी विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
राज्यात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून बहुतांश जिल्ह्यांत मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीस सुरुवात झाली. जवळपास गेले 20 दिवस पावसाने 34 तालुक्यांत हजेरी लावली असून, कमी-अधिक प्रमाणात पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. पावसाची अशीच स्थिती राहिल्यास नुकसानीचा आकडा वाढण्याचा अंदाज कृषी आयुक्तालयातून वर्तविण्यात आला.
उन्हाळी हंगामातील भात, मूग, उडीद, ज्वारी, तीळ, मका, भुईमूग, कांदा, भाजीपाला, टोमॅटो, कांदा-बटाटा, लिंबू, पपई, केळी, संत्रा, मोसंबी, आंब्याचे नुकसान झाले आहे. तसेच, अन्य फळबागांना हानी पोहोचली आहे. सिंधुदुर्ग, नाशिक जिल्ह्यांत शेतकर्यांनी तयार केलेल्या भातरोपवाटिकाही वाया गेल्याची स्थिती आहे. त्यामुळे जमिनीला वाफसा लवकर येण्याची चिन्हे कमी असल्याने खरीप हंगामातील पेरण्याही लांबण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अमरावती 12,565, अकोला 909, चंद्रपूर 1,572, बुलडाणा 6,699, जळगाव 4,538, पालघर 796, लातूर 957, जालना 1,726, छत्रपती संभाजीनगर 456, सोलापूर 1,682, अहिल्यानगर 1,441, नाशिक 3,523, पुणे 676, कोल्हापूर 95, सांगली 6, सातारा 73.