सातारा : माण तालुक्यातील दहिवडीसह म्हसवड परिसरात सलग 5 ते 6 दिवसांपासून वरुणराजा भलताच बरसला. गत 5 दिवसांपासून मान्सुनपूर्व पावसाने माण तालुक्यात संतत धार सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्याच्या पश्चिमेस पावसाचा जोर वाढल्याने व माण गंगा परिसरात सततच्या पावसाने माणगंगा नदी दुथडी भरुन वाहु लागली आहे.
उन्हाळी अवर्तनाच्या जिहे कठापूरच्या पाण्याची वरुण राजाला साथ लाभल्याने मे महिन्यात माणगंगा नदीला पूर ही इतिहासातील पहिलीच घटना आहे. उन्हाळी अवर्तनाचे जिहे कठापूर योजनेचे पाणी माण गंगेत सोडले होते. त्यास भरीस भर म्हणून वरुण राजा ही यथेच्छ बरसला. परिणामी आता ब्रिटिशकालीन राजेवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे.
यंदा उन्हाळी आवर्तनाचे जिहे-कठापूर योजनेचे पाणी माणगंगा नदीत सोडले होते. त्यातच मान्सूनपूर्व पाऊस तलाव सिंचन क्षेत्रात जोरदार बरसला. त्यामुळे मेच्या सुरुवातीला या तलावात १० फूट पाणी पातळी होती. हा तलाव पूर्ण क्षमतेने वाहण्यासाठी २५ फूट पाणीसाठा होणे गरजेचे असते. माणगंगा दुथडी भरुन वाहिल्याने हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे.