

Mumbai Maratha Morcha : मनोज जरांगे-पाटील यांनी २९ ऑगस्टपासून मुंबईत सुरू केलेल्या आंदोलनाविरोधात केलेल्या जनहित याचिकेवर आज (दि.१) दुपारी मुंबई उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी झाली. "आंदोलन हाताबाहेर गेले आहे. आम्ही संयम ठेवला कारण काही तरी चांगल व्हावं, अशी आमची इच्छा होती," असे स्पष्ट करत पावसात आंदोलन करताय तर चिखलात बसण्याची तयारी ठेवा, असेही न्यायालयाने सुनावले. तसेच या मुद्यावर उद्या दुपारी तीन वाजता सुनावणी होईल, असे स्पष्ट केले.
मराठा आंदोलनामुळे मुंबईकरांची मोठया प्रमाणात गैरसोय होत असल्याने याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी एमी फाऊंडेशनच्या वतीने दाखल केलेल्या याचिकेमध्ये करण्यात आली हाेती. याचिककर्त्यांची मागणी मान्य करत न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर तातडीची सुनावणी झाली. आंदोलन हाताबाहेर गेले आहे. आम्ही संयम ठेवला कारण काही तरी चांगल व्हावं, अशी आमची इच्छा होती, असे स्पष्ट करत पावसात आंदोलन करताय तर चिखलात बसण्याची तयारी ठेवा, असेही न्यायालयाने सुनावले. या आंदोलनाचा मुंबईकरांना त्रास होवू नये. उद्या शाळा आणि कॉलेजवरही परिणाम होईल. आम्ही आंदोलनाच्या विरोधात नाही मात्र नियम व अटींचे पालन करा. मुंबईकरांना उगाच त्रास होत कामा नये. २६ ऑगस्टला आम्ही दिलेल्या निर्देशाचे काटेकोर पालन करा, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला.
काही नियमांचे पालन करण्याच्या शर्थीवर आंदोलनास परवानगी देण्यात आली होती. तिथं कुणीही उघड्यावर घाण करू नये, वाहतुकीस अडथळा आणू नये, पोलिसांनी अटकाव करू नये, सायंकाळी 6 नंतर आंदोलन संपवून जागा रिकामी करावी, अश्या अनेक अटीशर्ती घालूनच केवळ एका दिवसाची परवानगी दिली होती. राज्य सरकारनं या आंदोलनातील मागण्यांचा विचार करण्याकरता एक समिती तयार केलीय. त्या समितीच्या माध्यमातून मागण्यांचा विचारही सुरू आहे. तसेच आंदोलकांशी चर्चादेखील सुरू आहे. हमीपत्र देताना अटींचे पालन केले जाईल, असे आंदोलकांकडून सांगण्यात आले होते. मुंबईत पाच हजार आंदोलकांना परवानगी देण्यात आली होती. मात्र या अटींचे उल्लंघन झाले आहे. हजारो आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. आंदोलकांनी सध्या मुंबईला खेळाचं मैदान बनवलंय, पोलिसांचे निर्देश पाळले जात नाहीत. संपूर्ण दक्षिण मुंबईत रास्ता रोको केला जातोय, अशी माहिती महाधिवक्त्यांनी दिली. नियमांचे उल्लंघन होत असेल तर तुम्ही नोटीस बजावू शकता. यावेळी आंदोलनावेळी देण्यात आलेल्या हमीपत्रातील अटींचे उल्लंघनाबाबत जरांगे यांना नोटीस बजावली होती का?, आंदोलन रस्त्यावर उतरले तेव्हा तत्काळ कारवाई का केली नाही, अशी विचारणा यावेळी न्यायालयाने केली. गणेशोत्सवात दिवसात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. आधीच बंदोबस्ताचा ताण असलेल्या पोलीसांवर सध्या प्रचंड दबाव आहे.शनिवार-रविवारच्या आंदोलनासाठी कोणतीही परवानगी दिलेली नव्हती. या प्रश्नी न्यायालयाने निर्णय द्यावा, आम्ही तत्काळ करु, असे महाधिवक्त्यांनी सांगितले.
लाठीचार्ज झाला तर महाराष्ट्र बंद करू, अशी धमकीही दिली जातेय?, असे सवाल करत आमरण उपोषणाची परवानगीच नियमात नाही, तर मग या आंदोलनाला परवानगीच कशी दिली?, हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल केला. परवानगी मागताना तसा उल्लेख केला गेला नव्हता, महाधिवक्तांनी सांगितले.
जरांगे-पाटील यांचे आंदोलन बेकायदेशीर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आंदोलनास रसद पुरवत आहेत. आंदोलनात थेट राजकीय सहभाग आहे. सर्व शहरातील रस्ते अडवले जात आहेत, असे अॅड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले. महिला पोलीस अधिकारी पाया पडतायत.पोलीस हतबल झाले आहेत. त्यामुळे आता उच्च न्यायालयाने कारवाईचे आदेश द्यावेत. माझ्या मुलीला पण उद्या शाळेत जायचं आहे, असे ॲड. सदावर्ते म्हणाले. यावर सदावर्ते तुम्ही विसरू नका तुमच्या मुलीला आई पण आहे. आपली मुलगी म्हणा ते चांगल आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
सीएसएमटी हा परिसर अत्यंत संवेदनशील आहे. या परिसरात अनेक महत्त्वाची कार्यालय आहेत, रूग्णालय आहेत.त्यामुळे सामान्यांना या आंदोलनाचा प्रचंड त्रास होतोय. कोर्टाला आंदोलक घेराव घालत आहेत. मुख्य आंदोलक राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल, त्यांच्या आईबद्दल अपशब्द खुलेआम वापरतोय तर तिथं पोलिसांची काय किंमत?, असा सवाल याचिकाकर्ते ॲड. सदावर्ते यांनी केला. आंदोलनस्थळी एक महिला खासदार तिथं गेल्या होत्या त्यांच्यावरही पाण्याच्या बाटल्या फेकल्या गाडीवर हल्ला केला. वार्तांकन करणा-या महिला पत्रकारांशीही गैरवर्तन करण्यात आलंय, असेही ॲड सदावर्ते यांनी युक्तीवादावेळी सांगितले.
आम्हाला वानखेडे स्टेडियम आम्हाला उपलब्ध करुन द्यावे. सर्व काही सुरळीत करण्यासाठी करण्यासाठी दोन दिवसांची मुदत द्या, अशी मागणी आंदोलकांच्या वकिलांनी या वेळी केली.दोन दिवसांमध्ये सर्व नियमांचे पालन होईल, याची खात्री देता का, असा सवाल न्यायालयाने मराठा आंदोलकांच्या वकिलांना केला. यावर त्यांनी आम्ही सर्व आंदोलकांना आवाहन करु शकतो, असे सांगितले. यानंतर न्यायालयाने मंगळवारी (२ सप्टेंबर) पुन्हा सुनावणी घेऊ आणि काय ते ठरवू, असे स्पष्ट केले.
जरांगे पाच हजार आंदोलकांची मर्यादा पाळून बाकी सर्वांना परत जाण्याबाबत प्रेस नोट उद्यापर्यंत देणार का?, तुम्ही आम्ही दिलेले आदेश मानायला तयार नाही. तुम्हीच सांगताय की, आंदोलक तुमच्या नियंत्रणात नाहीत. आणि अश्यात तुम्ही मुंबईची ओळख असलेल्या दोन आंतराराष्ट्रीय दर्जाच्या स्टेडियमची मागणी करताय? त्या स्टेडीयमची काय अवस्था होईल, याची कल्पना आहे का?तुम्हाला वाटतंय आम्ही तसे आदेश देऊ?, अशी प्रश्नांची सरबत्ती करत तुम्ही सर्वांनी जाऊन मनोज जरांगे यांच्याशी बोला, त्यांना कोर्टाच्या आदेशांची जाणीव करून द्या, अशी सूचना उच्च न्यायालयाने आंदालकांच्या वकिलांना केली.