

मुंबई : मराठा आरक्षण संदर्भात उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवर आजच्या बैठकीत चर्चा झाली. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आम्ही तयार आहोत, अशी माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. शनिवारी (दि. ३०) मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या आपल्या प्रमुख मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे शुक्रवारपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आम्हाला गोळ्या घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही येथून हलणार नाही, जेलमध्ये टाकले तर तिथेही उपोषण सुरू ठेवू, असा निर्धार त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर आज मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडली. बैठकीनंतर विखे पाटील म्हणाले की, "मराठा आरक्षणाच्या प्रश्नाच राजकारण करण्यापेक्षा किंवा एकमेकांवर टीका करण्यापेक्षा हा प्रश्न कसा सुटेल हे सर्वांनी पाहीलं पाहिजे. राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची याबाबत सकारात्मक भूमिका आहे, असेही विखे-पाटील यांनी यावेळी सांगितले.