

मुंबई: सरकारी रुग्णालये आणि अनास्था, हे समीकरण बदलण्यासाठी राज्य सरकारने सर्व सरकारी रुग्णालयांत स्टार रेटिंग प्रणाली सुरू करण्याचा निर्णय केला आहे. उपचारांसोबतच रुग्णांना मिळणारी वागणूक, एकाच ठिकाणी औषधे आणि तपासण्यांची सुविधा या निकषांवर हे स्टार रेटिंग दिले जाईल. त्यासाठी वर्षातून दोनवेळा ‘रिपोर्ट कार्ड’ तयार केले जाणार आहे.
सरकारी रुग्णालयांना शून्य ते पाच स्टार मिळवण्यासाठी एकूण १० निकषांतून जावे लागेल. प्रत्येक निकषामागे अर्धा स्टार मिळेल, सर्व निकष पूर्ण करणाऱ्या रुग्णालयालाच ‘फाईव्ह स्टार’चा बहुमान मिळेल. त्यासाठी, बायोमेट्रिक हजेरी, किमान ८० टक्के डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती बंधनकारक असेल.
रुग्णालयात आवश्यक औषधांचा साठा ८० टक्क्यांहून अधिक असणे आणि एक्स-रे, ईसीजी व प्रयोगशाळा चाचण्या सुरू असणे आवश्यक आहे. बाह्यरुग्ण विभाग व रुग्णांसाठीच्या खाटांचा वापर यांचेे प्रमाण योग्य असावेे. स्वच्छता, २४ तास पिण्याचे पाणी, स्वतंत्र शौचालये, ऑक्सिजन व बॅकअप वीजपुरवठा अत्यावश्यक असेल.
दरवर्षी जानेवारी आणि ऑगस्टमध्ये प्रत्येक रुग्णालयाचे स्टार रेटिंग जाहीर केले जाणार आहे. जे रुग्णालय उत्कृष्ट कामगिरी करून ४ किंवा त्याहून अधिक स्टार मिळवेल, त्यांना गौरवपत्र देऊन सन्मानित केले जाईल.
यामुळे रुग्णालयांमध्ये निरोगी स्पर्धा होईल. त्याचा फायदा रुग्णांना होईल. राज्यातील ६२३ सरकारी रुग्णालये या प्रणालीत येतील. दर्जेदार आरोग्य आणि सरकारी आरोग्य यंत्रणेवर सर्वसामान्यांचा विश्वास पुन्हा दृढ व्हावा, यासाठी ही प्रणाली आणली आहे.
रुग्णांकडून घेणार अभिप्राय
आता रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे वर्तन आदरयुक्त होते का? रुग्णाला वैद्यकीय स्थितीनुसार पौष्टिक जेवण मिळाले का? कॉरिडॉर आणि स्वच्छतागृहे स्वच्छ होती का? रुग्णाला त्याचे आजारपण नीट समजावून सांगण्यात आले का? या आणि अशा अनेक मानवी घटकांवर आधारित रुग्णांचे अभिप्राय फोनद्वारे नोंदवले जाणार आहेत.