Dahanu Flood News: दोन दिवसांच्या मुसळधार पावसाने डहाणू जलमय! 2002 नंतर प्रथमच भीषण पूरस्थिती

शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त, पूल वाहून गेल्याने गुजरातचा संपर्क तुटला, शहर-ग्रामीण भागात हाहाकार
Dahanu Flood News
Dahanu Flood NewsPudhari
Published on
Updated on

डहाणू: सलग दोन दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसाने डहाणू शहरासह संपूर्ण तालुक्याला अक्षरशः जलमय केले. शहरातील रस्ते, घरे, दुकाने, बँका, बस डेपो आणि काही शासकीय कार्यालयांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले.

ग्रामीण भागातील अनेक पूल आणि रस्ते पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. नागरिकांनी सन २००२ नंतर प्रथमच एवढ्या भीषण पूरस्थितीचा सामना करावा लागल्याची भावना व्यक्त केली.

बुधवारपासून सुरू झालेल्या संततधार पावसाचा सर्वाधिक फटका शहराच्या पश्चिम भागाला बसला. अनेक घरे, दुकाने आणि बँकांमध्ये पाणी शिरले, तर रस्त्यांवर उभी असलेली काही वाहने पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेली. अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याने मोठे नुकसान झाले.

रस्ते, पूल आणि दळणवळण व्यवस्था ठप्प झाल्याने शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. डहाणूतील जलाराम मंदिर, इराणी रोड, चंद्रिका हॉटेल परिसर, सागर नाका ते केटीनगर, मसोली शिपाईपाडा, चंद्रसागर मुख्य रस्ता आणि मुख्य बाजारपेठ पूर्णपणे पाण्याखाली गेली. बस डेपोमध्ये पाणी शिरल्याने एसटी बससह अन्य वाहने अडकून पडली.

Dahanu Flood News
Mazgaon Assault Case Verdict: तब्बल ४४ वर्षांनंतर निकाल; प्राणघातक हल्ल्यातून वृद्धाची निर्दोष मुक्तता

वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांना अन्न, पाणी आणि निवाऱ्याची गैरसोय सहन करावी लागली. इराणी रोडवरील एचडीएफसी, आयडीबीआय आणि ॲक्सिस बँकेमध्येही पाणी शिरले. मोबाईल नेटवर्क, वीजपुरवठा आणि इतर अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.

कंक्राडी रेल्वे पूल आणि आगर रस्त्यावरील पानखाडी पूल पाण्याखाली गेल्याने कोसबाड-घोलवड-बोर्डी मार्गासह अनेक मार्ग बंद झाले. सावटा परिसर जलमय झाला, तर आगर गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले.

पारनाका-बोर्डी सागरी मार्गावर प्रांत कार्यालय आणि डहाणू पोलिस उपविभागीय कार्यालयाजवळ वडाचे झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. नरपड-आंबेवाडी सागरी राज्यमार्गावरील पूल रस्त्यासह वाहून गेल्याने बोर्डीमार्गे गुजरातचा संपर्क पूर्णपणे तुटला.

पुरामुळे शेकडो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असून घरातील धान्य, फर्निचर, विद्युत उपकरणे आणि जीवनावश्यक साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. गुरुवारी दुपारनंतर पावसाचा जोर कमी होताच पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले.

Dahanu Flood News
Mumbai Student Protest Controversy: मुंबईत महिला आंदोलकांशी गैरवर्तन नाही; भाजपचा दावा

त्यानंतर नागरिकांनी घरे आणि दुकाने स्वच्छ करण्यास सुरुवात केली. प्रशासनाने बचाव आणि मदतकार्य सुरू ठेवत धोकादायक ठिकाणी दोरखंड लावून वाहतूक रोखली, तसेच पडलेली झाडे हटवून रस्ते खुले करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले.

कामगार अडकले; अनेकांचा पायी प्रवास

गुजरातमधील उंबरगाव औद्योगिक परिसरात कामासाठी गेलेले शेकडो कामगार वहिंद्रा पूल पाण्याखाली गेल्याने तेथेच अडकून पडले. वाहतुकीची सुविधा उपलब्ध नसल्याने अनेकांनी पायी डहाणूकडे परतण्याचा मार्ग स्वीकारला.

शुक्रवारी पावसाने उघडीप दिल्यानंतर जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले असून मदत, पुनर्वसन आणि पंचनाम्याचे काम सुरू आहे. २००२ च्या महापुराच्या आठवणी ताज्या करणाऱ्या या आपत्तीनंतर बाधित नागरिकांनी शासनाकडे तातडीची आर्थिक मदत आणि नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news