

मुंबई : 15 जानेवारीला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी गिरगावातील सुज्ञ मतदार बंधू- भगिनी आपल्या जवळच्या मतदार केंद्राकडे ये -जा करत असताना ते आपले नातेवाईक, मित्रमंडळी व आजूबाजूच्या रहिवाशांसोबत चर्चा करत काही वेळ रस्त्यात उभे राहत होते. परंतु चर्चा करत असताना लोकांना पाहून परिमंडळ 2 चे उपायुक्त मोहित गर्ग हे नागरिकांना दमदाटी करून त्यांच्या अंगावर धावत जाऊन दहशत निर्माण करत होते. यावेळी पोलिसांच्या भीतीमुळे गिरगावातील नागरिक रस्त्यावर उतरण्यास घाबरू लागले.
इमारतीखाली बसलेल्या एका वयस्क व्यक्तीला सी पी टॅक परिसरात उपायुक्त उपादमबाजी करत असताना एका शिवसैनिकाने त्या वयस्कर व्यक्तीची बाजू घेतली. यावेळी बाचाबाची झाल्याने उपायुक्त मोहित गर्दी यांनी मिलिंद वेदपाठक नावाच्या शिवसैनिकाला पोलीस ठाण्यात नेऊन काही काळ डांबून ठेवले. त्यानंतर शिवसैनिकांनी व्ही पी रोड पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. या प्रकरणात खासदार अरविंद सावंत यांनी उपायुक्त गर्ग यांना चांगलेच खडे बोल सुनावल्याचे समजते. त्यानंतर मिलिंद वेदपाठक यांना काही काळाने सोडून देण्यात आले.
तत्पूर्वी गिरगावातल्या केशवजी नाईक चाळीत विशाल रायकर नावाच्या भाजपा कार्यकर्त्याच्या घरात आलेल्या दहा पंधरा बोगस मतदारांना सेना, मनसे कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. परंतु या प्रकरणातही महाराष्ट्र नवनिर्माण सेने चा कार्यकार्ता कुलदीप बापर्डेकर यालाही पोलीस ठाण्यात डांबून ठेवण्यात आले होते.
बोगस मतदारांना सोडवण्याकरता मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेक भाजपा कार्यकर्ते व्हि पी रोड पोलीस ठाण्यात दाखल झाले असता यावेळी दोन्ही बाजूच्या गटांमध्ये चांगलीच जुंपली होती. मंगलप्रभात लोढांवरही मनसे कार्यकर्त्यांनी कारवाईची मागणी केली. त्यानंतर काही काळाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना सोडून देण्यात आले.
मतदानादिवशी सुट्टी जाहीर केल्यामुळे इमारतीखाली गप्पागोष्टी करताना आढळल्यावर मोहित गर्ग पन्नास, साठ पोलिसांचा ताफा या गल्ल्यांमध्ये घुसवून नागरिकांमध्ये दहशत माजवत होते. अशा प्रकारची कारवाई पाहून गिरगावातील नागरिक 1993 साली पोलिसांनी केलेल्या कारवाईची आठवण काढत आहेत. या दहशतीमुळे काही काळ गिरगावात अतिशय शांतता पसरली होती. परंतु तरीही गिरगावकर नागरिकांनी मतदान करण्यासच प्रथम प्राधान्य दिल्याचे पहावयास मिळाले.
मराठीबहुल परिसरातच दहशतवाद वारंवार उपायुक्त मोहित गर्ग मराठी बहुल परिसरात दहशतवाद माजवत असल्याचे दिसत असल्यामुळे गिरगावातील मराठी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांविषयी नाराजी पसरली होती. अशा प्रकारे पोलीस आकसाने कारवाई करत असल्याचे यापूर्वी गिरगावकरांनी कधी पाहिले नसल्याचे सेना, मनसे कार्यकर्त्यांनी सांगितले. उपायुक्त मोहित गर्ग आपल्या वर्दीचा फायदा घेत अशा प्रकारची कारवाई फक्त मराठी बहुल परिसरातच करत असल्याचा आरोपही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी केला आहे.