Ghatkopar Sewage Treatment Plant: घाटकोपर येथील मलजल प्रक्रिया केंद्र २०२७ पर्यंत लोकसेवेत

घाटकोपर, मानखुर्द, गोवंडी आणि चेंबूरमधील लोकसंख्येला होणार फायदा; अतिरिक्त आयुक्तांकडून पाहणी
Ghatkopar Sewage Treatment Plant
Ghatkopar Sewage Treatment PlantPudhari
Published on
Updated on

मुंबई: समुद्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या गुणवत्ता वाढीसाठी मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत घाटकोपर ( पूर्व) येथे मलजल प्रक्रिया केंद्राचे काम मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रगतीपथावर आहे.

हे काम ३१ मार्च २०२७ पर्यंत पूर्ण होऊन ते लोकसेवेत दाखल होणार आहे. या प्रकल्पाच्या ठिकाणी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी शुक्रवारी पाहणी केली. तसेच घाटकोपर, मानखुर्द, गोवंडी आणि चेंबूर परिसरातील लोकसंख्येला या प्रकल्पाचा फायदा होणार आहे.

Ghatkopar Sewage Treatment Plant
BMC Office Ceiling Collapse: अंधेरीत सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयाचा कोसळला स्लॅब; महापालिकेचे २७ कोटी पाण्यात

मलनिस्सारण प्रकल्प विभागाच्या वतीने ३३७ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या घाटकोपर मलजल प्रक्रिया केंद्राचे रचना, बांधकाम आणि प्रचालन व परिरक्षण करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. मलनिस्सारण प्रकल्पाचे काम विहित वेळेत व वेगाने पूर्ण करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळाची कुमक वाढवावी. तसेच नियोजनबद्ध पद्धतीने प्रकल्पाचे काम पूर्ण करावे, असे निर्देश बांगर यांनी दिले.

सध्या मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पावसाने उसंत घेतली असल्याने या कालावधीचा सदुपयोग प्रकल्पाचे काम पुढे नेण्यासाठी करावा, अशीही सूचना त्यांनी केली. प्रकल्पातील विविध टप्प्याचे काम हे समांतर पद्धतीने करावे. प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. नियोजनबद्ध काम केल्यास मुदतीपूर्व या प्रकल्पाचे काम पूर्ण करणे शक्य असल्याचेही म्हणाले.

Ghatkopar Sewage Treatment Plant
Bhandup Gas Leak Fire: भांडुपमध्ये गॅसगळतीमुळे आग, ३ जण भाजले; देखभाल दुरुस्ती करत असताना घडली घटना

घाटकोपर उदंचन केंद्राच्या ठिकाणी सुरू असलेल्या स्थापत्य व विद्युतीकरणाच्या कामाचा आढावा अभिजित बांगर यांनी प्रकल्पस्थळी भेट देऊन घेतला. याठिकाणी उदंचन केंद्राच्या इमारतीची दुरूस्ती, संयंत्रे बदलणे, रायझिंग मेन टाकणे, अधिक क्षमतेचे पंप लावणे यासारखी कामे हाती घेण्यात आली आहेत.

सद्यस्थितीला उदंचन केंद्राच्या कामाची ८५ टक्के इतकी भौतिक प्रगती झाली आहे. मलजल प्रक्रियेसाठी महत्वाच्या अशा उदंचन केंद्राचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश बांगर यांनी दिले. नवीन मलजल प्रक्रिया केंद्र सुरू झाल्यानंतर, समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता आणि सागरी जीवनामध्ये सुधारणा होईल.

दररोज ३३७ दशलक्ष लिटर मलजलावर प्रक्रिया होणार

मलनिस्सारण प्रकल्पामध्ये, दररोज ३३७ दशलक्ष लिटर मलजलावर द्वितीय स्तरीय प्रक्रिया केली जाईल, त्यापैकी १७० दशलक्ष मलजलावर दररोज पुढील तृतीय स्तरीय प्रक्रिया केली जाईल. सध्या घाटकोपर येथे अस्तित्वात असलेल्या मलजल प्रक्रिया केंद्रात मलजलावर स्क्रिनिंग आणि डिग्रिटिंगची प्राथमिक प्रक्रिया करून ते खाडीमध्ये सोडले जाते.

जीव्हीपीआर इंजिनीयर्सला काम

मुंबई मलनिस्सारण प्रकल्प विभागाने ३३७ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या घाटकोपर मलजल प्रक्रिया केंद्राचे रचना, बांधकाम आणि प्रचालन व परिरक्षण करण्याचे काम जिव्हीपीआर इंजिनीयर्स लि. या कंत्राटदारास दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news