

मुलुंड: भांडुपच्या खिंडीपाडा परिसरातील अमन नगरमध्ये देखभाल दुरुस्तीच्या कामादरम्यान गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत तीन जण भाजले आहेत. ही घटना रविवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास भांडुपच्या खिंडीपाडा येथील अमन नगर भागातील एका निवासी घरात घडली. एका तंत्रज्ञाकडून देखभाल दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक गॅस गळती झाली आणि त्यामुळे ही आग भडकली.
दरम्यान, या आगीत प्रमिला विश्वकर्मा (५०) आराधना विश्वकर्मा (२४) आणि मोहम्मद (५२) हे तीन जण गंभीर भाजले आहेत. या तिन्ही जखमींना उपचारासाठी मुलुंड येथील महापालिकेच्या एम टी अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय पथक जखमींवर आवश्यक उपचार करत आहेत. रात्रीपर्यंत तिन्ही जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
प्राथमिक माहितीनुसार, घरात गॅस जोडणी किंवा उपकरणाच्या देखभाल दुरुस्तीचे काम सुरू होते. हे काम करण्यासाठी एक तंत्रज्ञ तेथे आला होता. दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक गॅसची मोठी गळती झाली, ज्याने त्वरित पेट घेतला आणि घरात आग भडकली.
अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी काही वेळातच आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवून आग शमवण्यात त्यांना यश आले. पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, एक स्थानिक कामगार, गॅस सिलेंडरशी संबंधित काम करत असताना ही घटना घडली.