

मुंबई: पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) असल्याची बतावणी करून लोकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनावट कागदपत्रे बाळगणाऱ्या वैभव दीपक नारकर या ३३ वर्षीय तरुणाला घाटकोपर पोलिसांनी अटक केली.
वैभवच्या मोबाईलमध्ये पोलीस उपनिरीक्षकाच्या गणवेशातील फोटो, बनावट नेमप्लेट तसेच पोलिसांचा लोगो असलेली कागदपत्रे आढळली आहेत.
२७ नोव्हेंबर रोजी रात्री ८.४० वाजण्याच्या सुमारास सहायक पोलीस निरीक्षक रिना लोहार आणि त्यांचे पथक घाटकोपर पश्चिमेकडील स्टेशन रोड परिसरात, भारत कॅफेसमोर गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत असताना त्यांना वैभव संशयास्पद अवस्थेत दिसला.
चौकशी केली असता, त्याने आपण २०१५ बॅचचा पोलीस उपनिरीक्षक असल्याचे सांगत, 'तुम्ही माझी चौकशी करणारे कोण?'असा उलट प्रश्न केला. स्वतःचे नाव सांगण्यासही टाळाटाळ केली.
गणवेशातील फोटो आणि मोबाईलमध्ये आढळलेल्या कागदपत्रांबाबत विचारणा केली असता, त्याला समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. पोलीस उपनिरीक्षक असल्याची खोटी बतावणी करून लोकांची फसवणूक करण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून बाळगल्याच्या आरोपावरून त्याच्याविरुद्ध घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १३८०/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम २०४, ३१९ (२), ३३६ (२) आणि ३४० (२) अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपी हा मूळचा विरार येथील राहणारा असून त्याने लग्नासाठी तयार केलेल्या प्रोफाइलमध्ये तो पोलीस उपनिरीक्षक असल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे या आरोपीने अनेकांची फसवणूक केली असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याने किती जणांना गंडवले याचा शोध घेतला जात आहे.