

नरेश कदम
मुंबई: ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट यांचे खासदार भाजपने फोडले तसेच शरद पवार गटाचेही काही खासदार फुटणार होते. त्यामुळे पक्ष फुटण्यापेक्षा डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली असल्याचे शरद पवार गटातून सांगण्यात येत असले तरी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने इंडिया आघाडीत मजबूत साथ देणाऱ्या डीएमकेला फेकून दिले.
त्यामुळे आतापर्यंत काँग्रेससोबत राहणाऱ्या शरद पवार यांनी ही धोक्याची घंटा ओळखली . त्यामुळे इंडिया आघाडीतले डीएमके आणि शरद पवार गट हे दोन पक्षांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडले, असे खात्रीलायक वृत्त आहे.
शरद पवार गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी, डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गट पाठिंबा देणार असल्याचे शुक्रवारी जाहीर केले. तर आता विधेयकाचा मसुदा वाचल्यावर निर्णय घेवू , असे सुप्रिया सुळे यांच्यासह या गटाचे खासदार शनिवारी दिवसभर सांगत होते. शरद पवार यांच्या ८ खासदारांपैकी चार जण भाजपच्या गळाला आधीच लागले आहेत.
त्यामुळे या विधेयकाला पाठिंबा देवून पक्ष वाचविणे योग्य असल्याची भूमिका पवार गटाचे नेते मांडत आहेत. जर सरकारमध्ये सामील झालो नाही तर आपले भवितव्य अंधारात आहे, असे या खासदारांना वाटत आहे. विकास कामांना निधी मिळणार नाही, अशी कैफियत ही त्यांनी शरद पवार यांच्याकडे मांडली होती.
डीएमकेने या विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय आधीच घेतलेला होता. ज्यावेळी काँग्रेसने डीएमकेला राज्यातील सत्तेसाठी सोडले , त्याचवेळेपासून भाजपच्या चाणाक्ष नेत्यांनी त्यांच्याशी संवाद सुरू केला. काँग्रेसच्या निर्णयाने डीएमके दुखावला गेला. माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी सर्वात आधी या विधेयकाला विरोध केला होता.
पण त्याच स्टॅलिन यांनी या विधेयकाला साथ देण्याचे चार महिने आधीच ठरवले. पण काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यांनी स्टॅलिन यांच्याशी चर्चा केली नाही. एक ही खासदार नसलेल्या विजय याच्या पक्षासोबत ते सत्तेत गेले पण २२ खासदार असलेल्या डीएमकेशी त्यांना चर्चा करावी असे त्यांना वाटले नाही.
डीएमके या विधेयकाला पाठिंबा देणार असेल तर हे विधेयक भाजप मंजूर करून घेईल, अशी चर्चा शरद पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांमध्ये झाली.एकीकडे खासदार फुटण्याचे संकट आणि दुसरीकडे ज्या पद्धतीने काँग्रेसने डीएमकेला वागणूक दिली त्यामुळे शरद पवार यांचे मोदी सरकारच्या या विधेयकाला पाठिंबा देण्याचे मत ठाम होत गेले.
त्यानंतर शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात या विषयावर थेट संवाद सुरू झाला. यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि खासदार सुप्रिया सुळे या ही या प्रक्रियेत सामील होते…त्यामुळे डीएमकेशी काँग्रेसचा विसंवाद यामुळे इंडिया आघाडीतील डीएमके आणि शरद पवार गट यांनी ‘यू टर्न’ घेतला आणि हे मोदी सरकारच्या पथ्यावर पडले.