

मुंबई: स्वयंपाकाचा गॅस, मग व्यावसायिक गॅस, आता सीएनजी आणि पाठोपाठ पेट्रोल-डिझेलच्या दरात लिटरला 3 रुपयांची जबर दरवाढ झाल्याने देशभरात महागाईचा विस्फोट होण्याची चिन्हे असून, रोज लागणाऱ्या वस्तूंचे दर पुन्हा वाढवण्याची घोषणा फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स (एफएमसीजी) कंपन्यांनी केली आहे. याचा परिणाम म्हणून सर्वसामान्यांच्या गृहखर्चात पाच ते दहा टक्क्यांनी वाढ होईल, असा अंदाज आहे.
पश्चिम आशियातील युद्धामुळे पॅकेजिंग आणि उत्पादन खर्चात आधीच वाढ झाली आहे. आता इंधन दरांतही वाढ झाल्याने कंपन्यांचा वाहतूक, वितरण आणि कच्च्या मालाचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. आधीच 8 ते 10 टक्के महागाईच्या दबावाचा सामना खाद्यान्न कंपन्या करत असताना पेट्रोल, डिझेल महागले.
युद्धानंतर पॅकेजिंगशी संबंधित कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने उत्पादन खर्चात वाढ झाल्याने मारिको आणि डाबर इंडियाने यापूर्वीच दोन ते पाच टक्क्यांची वाढ केली आहे. डाबर इंडिया ग्लोबलचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहित मल्होत्रा म्हणाले, आम्ही आधीच चार टक्के किंमतवाढ केली आहे. आता पुन्हा किमतीत वाढ करणार आहोत. चालू आर्थिक वर्षात महागाईमुळे उत्पादनाच्या किमतीत दहा टक्के वाढ होऊ शकते.
महागाईचा दबाव असाच राहिला तर किंमत वाढ करण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही, असे बिटानिया इंडस्ट्रीज आणि हिंदुस्थान युनिलिव्हरच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. किमतीत वाढ करणे अटळ असले तरी नेमकी किती दरवाढ करायची याचे मूल्यांकन केले जात असल्याचे पार्लेचे मुख्य पणन अधिकारी मयंक शहा यांनी सांगितले.
कच्च्या तेलाच्या दरातील वाढीमुळे ग्रामीण भागातील मागणी मंदावण्याचा धोका वर्तविण्यात येत आहे. आम्ही घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. दरवाढ हा आमच्यासाठी नेहमीच शेवटचा पर्याय असल्याचे नेस्ले इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष तिवारी यांनी सांगितले.
जगणे महाग झाले
वार्षिक दरवाढीच्या तुलनेत टॉमेटोचे दर 35.28 टक्क्यांनी वाढले आहेत. बटाटे 23.69 टक्क्यांनी महागले.
व्यक्तिगत वापराच्या वस्तू 17.66 टक्क्यांनी भडकल्या आहेत.
सीएनजी दोन रुपयांनी, तर पेट्रोल-डिझेल तीन रुपयांनी शनिवारपासून वाढले. आता ॲप बेस्ड टॅक्सींचे दर वाढले असून, काली-पिली आणि ऑटो रिक्षांचे दरही कोणत्याही क्षणी वाढतील. सर्व प्रकारची मालवाहतूकही महाग झाली आहे.
इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतीही 10 ते 36 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
दूध महागले
अमूलचे दूध देशभर दोन रुपयांनी वाढताच गोकुळनेही शनिवारी दोन रुपयांचीच दरवाढ जाहीर केली. मदर डेअरीनेही अशीच दरवाढ केली आहे.