

मुंबई: पत्नीचे कथित प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून पतीने पत्नीसमोरच तिच्या कथित प्रियकराची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची घटना गोरेगावमधील आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव भीमराज ओमप्रकाश शर्मा (48) असून मृत व्यक्तीचे नाव विकास अशोक भुसारे आहे. दोघेही आरे कॉलनी येथील युनिट क्रमांक 5 परिसरात राहत होते. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.
आरोपीला आपल्या पत्नीचे आणि विकासचे कथित प्रेमसंबंध असल्याचा बराच काळ संशय होता. याच कारणावरून तो पत्नीसोबत अनेकदा वाद घालत होता. तसेच मृत विकासने आरोपीच्या पत्नीची पूर्वी छेड काढल्याची तक्रारही करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही विकास पत्नीच्या संपर्कात असल्याचा आरोपीला संशय होता. त्याच रागातून त्याने विकासला घरी बोलावून पत्नीसमोरच त्याचा काटा काढला.
पोलीस चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला पुढील तपासासाठी पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती आरे पोलीस स्थानकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिली.
नेमकी कशी घडली घटना?
आरोपी शर्मा याने कट रचत विकासला आपल्या घरी बोलावले. रात्री उशिरापर्यंत आरोपी, त्याची पत्नी आणि विकास यांनी एकत्र मद्यपान केले. त्यानंतर “माझ्या घरी वारंवार का येतोस, पुन्हा येऊ नकोस,” असे सांगत आरोपीचा संताप अनावर झाला.
यानंतर आरोपीने घरातील चाकू उचलून पत्नीसमोरच विकासवर वार करत त्याचा गळा चिरला. या हल्ल्यात विकासचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी आरे
जंगल परिसरात पळून गेला. घटनेची माहिती मिळताच आरे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि विकासचा मृतदेह ताब्यात घेऊन प्रकरणाचा तपास सुरू केला. गोरेगाव पोलिसांनी तीन स्वतंत्र पथके तयार करून आरोपीचा शोध घेत अवघ्या तीन तासांत त्याला पाठलाग करून अटक केली.