

जोगेश्वरी: पालघर येथील साधू हत्यांकडाची आठवण करून देणारी घटना मंगळवारी जोगेश्वरीत घडली. पूर्वेतील जेव्हीएलआर मार्गावर दुर्गानगर परिसरात संंशयावरून चार साधूंना मंगळवारी दुपारी काही तरुणांनी बेदम मारहाण केली. पोलिसांनी या साधूंना ताब्यात घेतले असून मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल करून दोघांना ताब्यात घेतले आहे. इतरांचा तपास सुरू आहे.
हे चारही साधू खरे मध्यप्रदेश येथून चारचाकी बोलेरो गाडीतून मुबंईत मुंबादेवी दर्शनासाठी आले होते. सोमवारी रात्री ते अंबरनाथ या ठिकाणी मुक्कामी होते. तेथून ते मुंबईत निघाले होते. मात्र त्यांच्याकडील पैसे संपल्याने जोगेश्वरी पूर्वेतील दुर्गानगर परिसरात त्यांनी गाडी थांबवून जेवण आणि पाणी मागत होते.
मात्र स्थानिकांना हे भोंदू साधू असून चोर किंवा आणि लहान मुले पळवणारी टोळीचे सदस्य असावेत असा संशय आल्याने काही तरुणांनी त्यांना पकडून मारहाण केली. याबाबत माहिती होताच एमआयडीसी पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत चौकशीसाठी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेले.
तेथे या सांधूंनी आपण मुंबई मुंबादेवी दर्शनासाठी आल्याचे सांगितले. पैसे संपल्याने आंम्ही जेवन व पाणी मागत होतो. मात्र काही जणांनी पडकून मारहाण केल्याचे पोलिसांना सांगितले. या प्रकरणात पोलिसांनी व्हिडिओच्या माध्यमातून साधूंना मारहाण करणाऱ्या तरुणांवर गुन्हा दाखल केला असून दोघांना ताब्यात घेतले असून इतरांचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.