

Mumbai news
नवी मुंबई: स्वप्ननगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईसह पनवेल परिसरातून चिंताजनक बातमी समोर आली आहे. मागील २४ तासांत वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चार अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे.
खारघर सेक्टर-२० मधील विजयनगरी सोसायटीत राहणाऱ्या १७ आणि १४ वर्षीय दोन सख्ख्या बहिणी मंगळवारी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्या. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, मोठी बहीण खाली गेल्यानंतर परत आली नाही. तिला शोधण्यासाठी धाकटी बहीण बाहेर गेली; मात्र तीही घरी परतली नाही. बराच शोध घेतल्यानंतरही काहीच माहिती न मिळाल्याने कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
तर उरण येथील कोट नाका परिसरातून १७ वर्षीय मुलगी बुधवारी सकाळी ११ ते १२ वाजण्याच्या दरम्यान घरातून अचानक बेपत्ता झाल्याची नोंद आहे. तसेच एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुर्भे गाव, सेक्टर-२१ येथे दहावीमध्ये शिकणारी १६ वर्षीय विद्यार्थिनी पाण्याची मोटार सुरू करण्याच्या निमित्ताने घराबाहेर पडली आणि परतली नाही. या सर्व प्रकरणांत पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
यापूर्वीही नवी मुंबई परिसरात अशा घटना घडल्या असून, अनेक प्रकरणांत मुले घरगुती कारणांमुळे किंवा पालकांच्या रागामुळे घर सोडून गेल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र, अवघ्या २४ तासांत चार अल्पवयीन मुली बेपत्ता होणे ही गंभीर बाब मानली जात आहे.