

पुढारी ऑनलाईन डेस्क : शालेय साहित्य आणि चित्रकलेशी संबंधित उत्पादनांची निर्मिती करणारा जगप्रसिद्ध उद्योगसमूह 'कॅमलिन'चे माजी अध्यक्ष सुभाष दांडेकर (८२) यांचे मुंबईत निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा आशिष, मुलगी अनघा असा परिवार आहे. त्यांच्या पत्नी रजनी यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले.
'कॅमलिन'चे माजी अध्यक्ष सुभाष दांडेकर (८२) यांचे मुंबईत निधन झाले.
त्यांच्या निधनामुळे राज्याच्या औद्योगिक वर्तुळात दुःख व्यक्त
त्यांच्या पत्नी रजनी यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले.
दांडेकर यांनी राज्यातील उद्योगांच्या समस्या सोडवण्याबद्दल महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या औद्योगिक वर्तुळात दुःख व्यक्त होत आहे. पेन्सिल, कंपास, विविध रंग, शाई, मार्कर, गणितासाठीचे साहित्य, कार्यालयीन स्टेशनरी संबंधित उत्पादने म्हटले की पटकन नजरेसमोर येणारे नाव म्हणजे कॅमलिन होय. 'कॅमलिन' हा ब्रँड जगभरात पोहोचवण्यात सुभाष दांडेकर यांचा मोठा वाटा होता. सुभाष दांडेकर यांनी या कंपनीच्या प्रमुख पदाची धुरा अनेक वर्षं सांभाळली होती. त्यांच्या कारकिर्दित 'कॅमलिन' हा जगप्रसिद्ध ब्रँड बनला.
१९९० आणि ९२ या काळात ते महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रिजचे अध्यक्ष होते. त्या काळात देशाने खुली अर्थव्यवस्था स्वीकारण्यास सुरुवात केली होती. त्यातून स्थानिक उद्योजकांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते. राज्यातील उद्योगांचे स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा पातळीवर उद्योगमित्र समिती स्थापन करण्याची कल्पना त्यांनी तत्कालीन उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांना सांगितली. त्यातून ही समिती स्थापन्यात आली. राज्यातील उद्योगांच्या समस्या सोडवण्यासाठी आजही या समित्या जिल्हापातळीवर कार्यरत आहेत.
हजारो उद्योजकांना प्रेरणा देणारे हजारो लोकांना रोजगार देणारे ज्येष्ठ उद्योजक आपल्यातून निघून गेले आहेत ही बाब मनाला वेदना देणारी आहे. दांडेकर कुटुंबीयांच्या दुःखामध्ये राज्यातील संपूर्ण व्यापार उद्योग क्षेत्र सहभागी आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीचे विद्यमान अध्यक्ष ललित गांधी यांनी सुभाष दांडेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.