नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांची शनिवारी (दि.१३) भेट घेतली. सकाळी ११ च्या सुमारास साधारण अर्धा तास ही भेट झाली. यामध्ये राज्यातील काही महत्त्वाच्या प्रश्नांसंदर्भात अमित शहा आणि अजित पवार यांच्यात चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
अजित पवार - अमित शहा यांची शनिवारी भेट
काही महत्त्वाच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा
लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका, या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर असताना त्याच दिवशी सकाळी अजित पवार यांनी अमित शहा यांची भेट घेतली. राज्यात नुकतीच विधान परिषद निवडणूक पार पडली. यामध्ये महायुतीने लढवलेल्या नऊ पैकी नऊ जागा जिंकल्या. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा चर्चेत आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला या गोष्टीचा फटका बसला. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, अशी भूमिका अजित पवारांनी मांडल्याचे समजते. सोबतच विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याच्या चर्चा आहेत, या संदर्भातही चर्चा झाल्याची माहिती आहे. तसेच राज्यात गेले अनेक दिवस राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा तिढा कायम आहे. अशा विविध विषयांवर देखील दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये महायुतीने लढवलेल्या नऊपैकी नऊ जागा जिंकल्या. त्यानंतर विधान परिषदेचे सभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळावे, अशीही अजित पवार गटाची मागणी असल्याचे समजते. अशा विविध मुद्द्यांच्या संदर्भात अजित पवार यांनी अमित शहा यांची भेट घेतली. आणि या भेटीनंतर अजित पवार तातडीने मुंबईला रवाना झाले.