शहापूर : मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी वाढतच चालली असून मुंबई - नाशिक महामार्गावरील आसनगावजवळ रेल्वे पुलाचे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे ठेकेदाराने पर्यायी मार्गाची केलेली व्यवस्था देखील तोकडी पडत असल्याने येथे वाहनचालकांना ट्रॅफिक जामचा सामना करावा लागत आहे. परिणामी प्रवाशांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
दरम्यान, याच ब्रिजच्या कामाची पाहणी करण्यासाठी आलेले जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे आदेश दिले होते. मात्र जिल्हा अधिकाऱ्यांची पाठ फिरताच खड्डे तर भरले नाहीतच शिवाय ट्रॅफिकचा खेळखंडोबा नेहमीप्रमाणे सुरू झाला आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्डे व ब्रिजच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी करून या मार्गावरील खड्डे तत्काळ बुजविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी यावेळी संबंधित ठेकेदारांना दिल्या होत्या. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस अधीक्षक मोहन पवार, भिवंडी उप विभागीय अधिकारी अमित सानप, वाहतूक विभागाचे उपआयुक्त विनयकुमार राठोड, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, एमएमआरडीए कार्यकारी अभियंता किस्ते तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, जिल्हाधिकारी शिनगारे यांनी ब्रिजची प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करावीत, कामे पूर्ण करीत असताना वाहतूक कोंडी होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशाही सूचना संबधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मात्र या महामार्गावरील ना खड्डे बुजवण्यात आले, ना ट्रॅफिक सुरळीत झाली. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही मुंबई-नाशिक महामार्गावरील समस्या जैसे थे राहिल्याने नागरिकांमध्ये शंका व्यक्त केली जात आहे.