सातत्याने होणाऱ्या अत्याचारांमुळे त्रस्त झालेल्या या मुलीने तिच्या घरच्यांसह बुधवारी रात्री मानपाडा पोलिस ठाणे गाठले आणि आपल्यावर सुरू असलेल्या अत्याचारांची कैफियत मांडली. या मुलीने स्वतःवर झालेल्या अत्याचारांचा पाढाच वाचल्यानंतर पोलिसही काही वेळ निश:ब्द झाले होते.
मात्र पोलिसांनी धीर दिल्यानंतर या मुलीने सर्व माहिती कथन केली. 29 जानेवारी ते 22 सप्टेंबर या 8 महिन्यांत बदमाश्यांनी आपल्याला डोबिवली, बदलापूर, मुरबाड आणि रबाळे परीसरात वेळोवेळी नेऊन अत्याचार तर केलेच, शिवाय शरीरसंबंधांचे मोबाईलमध्ये व्हिडीओ काढून हे व्हिडीओ व्हायरल करण्याच्या धमक्याही दिल्याचे पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटले आहे.
पोलिसांनी अत्याचारग्रस्त मुलीच्या जबानीवरून भादंविक 376, 376 (एन), 376 (3), 376 (ड) (अ) सह पोक्सो कायद्याचे कलम 4, 610 प्रमाणे गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्ह्याचे शहर पोलिस आयुक्त जयजीत सिंग, सह आयुक्त सुरेश मेकला, कल्याण प्रादेशिक पूर्व विभागाचे अपर आयुक्त दत्तात्रय कराळे, परिमंडळ 3 चे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस आयुक्त जय मोरे, मानपाडा पोलिस ठाण्याचे वपोनि दादाहरी चौरे यांनी तपासचक्रांना वेग दिला.
फरार आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांची 4 पथके वेगवेगळ्या दिशांना रवाना करण्यात आली. या अत्याचारकांडातील आरोपींची पूर्ण नावे व ठावठिकाणा माहीत नसतानाही खासगी गुप्तहेरांकडून मिळालेली माहिती, तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या 4 तासांतच 23 जणांना ताब्यात घेतले आणि चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.
ताब्यात घेतलेल्या 23 जणांपैकी दोघा अल्पवयीन तरुणांचाही या कांडात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांनाही ताब्यात घेतले आहे. गुन्हा उघडकीस आणून पीडित मुलीस न्याय देण्याचा सर्वोतोपरी आम्ही प्रयत्न करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या अत्याचारकांडात आणखी 10 जणांचा समावेश असून त्यांनाही हुडकून काढण्यासाठी पोलिसांची पथके जंग जंग पछाडत आहेत. विशेष म्हणजे या गंभीर अत्याचारकांडाचा तपास सहाय्यक पोलिस आयुक्त सोनाली ढोले यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
कळंबोलीच्या कॅप्टन बारजवळ सापळाएकेकाळी गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे एन्काऊंटर स्पेशालिस्ट निवृत्त पोलिस अधिकारी दत्ता घुले यांनी अत्याचारकांडातील प्रमुख बदमाश्यांना पकडण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली. मानपाड्याचे सपोनि यश भिसे आणि त्यांचे पथक बदमाश्यांचा माग काढत असतानाच दत्ता घुले यांनी यातील काही जण कळंबोलीतील कॅप्टन बारजवळ व्हॅगेनार कारमधून येणार असल्याची माहिती दिली. त्यानुसार सपोनि यश भिसे आणि त्यांच्या पथकाने या कांडातील मुख्य आरोपी जितेश उर्फ जितू पावशे, व्हॅगेनार कारचा ड्रायव्हर अशोक दरे, आदी बदमाश्यांच्या मुसक्या बांधल्या. या कांडातील सर्वप्रथम पकडलेले बहुतांशी आरोपी नितळसर गावचे असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.