

मुंबई: पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझचा बहुप्रतिक्षित कॉन्सर्ट उद्या (२७ नोव्हेंबर) मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे होणार आहे. या कॉन्सर्टची वेळ ही दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत असेल. नेहमीप्रमाणे दिलजीतच्या कॉन्सर्टला हजारो चाहत्यांची गर्दी उसळण्याची शक्यता असून, या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी सुरक्षेचा हाय अलर्ट जारी केला आहे. तसेच, मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांसाठी विशेष ट्रॅफिक सुचना केल्या आहेत.
कॉन्सर्टमुळे महालक्ष्मी रेसकोर्स, हाजी अली आणि केशवराव खाड्ये मार्ग परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी या भागात अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
मुंबई पोलिसांनी दक्षिण मुंबई आणि उत्तर मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्ग म्हणून कोस्टल रोडचा वापर करावा, असा सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय, कार्यक्रमासाठी येणाऱ्या प्रेक्षकांनी वैयक्तिक वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतूक साधने जसे की बेस्ट (BEST) बस, लोकल ट्रेन आणि मेट्रो यांचा वापर करावा, असेही पोलिसांनी सांगितले आहे.
यापूर्वी दिलजीत दोसांझ यांच्या कॉन्सर्टला बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली होती. ही गंभीर बाब लक्षात घेता मुंबई पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. कॉन्सर्टदरम्यान संपूर्ण परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असेल. मुंबई पोलिसांकडून कोणत्याही संशयास्पद हालचालींवर विशेष नजर ठेवली जाईल. नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.