ठाकरे सरकारच्या काळातच ‘त्या’ होर्डिंगला परवानगी : देवेंद्र फडणवीस

ठाकरे सरकारच्या काळातच ‘त्या’ होर्डिंगला परवानगी : देवेंद्र फडणवीस
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : घाटकोपरमध्ये होर्डींग पडून झालेल्या दुर्घटनेत निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला. या होर्डींगला ठाकरे सरकारच्या काळातच बेकायदेशीर परवानगी देण्यात आली होती. १२० बाय १४० फुटांच्या होर्डींग नियम नसताना बेकायदेशीरपणे परवानगी देण्यात आल्याचा थेट आरोप करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी (दि.१६) उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

होर्डींगची ही दुर्घटना अपघात नसून एकप्रकारे त्यावेळच्या सरकारच्या आशिर्वादामुळे झालेले खून आहेत. या होर्डींगच्या मालकाला अपघाताचे कारण पुढे करून सुटू देणार नाही. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून शिक्षा भोगायला लावू, असा इशाराही फडणवीस यांनी यावेळी दिला. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. उद्धव ठाकरे यांना लोकांचे जीव स्वस्त वाटत असतील पण आम्हाला तसे वाटत नाही, असा टोलाही फडणवीसांनी यावेळी लगावला.

कोविड काळातही देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी मोफत राशन आणि लसीकरणाचे कार्यक्रम राबवत होते. तेव्हा उद्धव ठाकरे भ्रष्टाचारात व्यस्त होते. १३०० रूपयांचा बाॅडीबॅग ६ हजार रूपयांनी खरेदी करण्यात आला. एका अर्थाने हे कफनचोर बनले. देशात मोफत राशन असताना मुंबई पालिकेच्या गरिबांच्या खिचडीत कमिशन खाल्ले, खिचडीचोर बनले. या निवडणुकीत या खिचडीचोर कफनचोरांना जाब विचारण्याची वेळ आली आहे, असेही फडणवीस म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वावरूनही फडणवीस यांनी जोरदार हल्लाबोल केला. बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडल्याने लोक सोबत येणार नाहीत, हे उद्धव ठाकरेंना माहित झाले आहे. त्यामुळेच एका समुदायाला जवळ करत त्यांना मतांचा हा अनुशेष भरून काढायचा आहे. परवा उद्धव ठाकरेंचा जुलुस निघाला तिथे पाकिस्तानचे झेंडे वापरले. एखादी निवडणूक जिंकलो हरलो, म्हणून फरक पडत नाही. पण, जिंकण्यासाठी पाकिस्तानचा झेंडा वापरायची वेळ येईल, तेंव्हा निवृत्ती घेऊन घरी बसेन. पण, हा पाकिस्तानचा झेंडा भारतात लावणार नाही, हे सांगण्याची हिंमत उद्धव ठाकरेंनी दाखवायला हवी होती. ती नाही म्हणूनच मोदी तुम्हाला नकली शिवसेना म्हणतात. आज तुमचे लोक गळ्यात मशालीचे पट्टे घालून टिपू सुलतान जिंदाबादच्या घोषणा देत फिरत आहेत, असेही ते म्हणाले.

दरम्यान, उत्तर मध्यचे भाजप उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी कुर्ल्यातही फडणवीसांनी सभा घेतली. पहिल्या चार टप्प्यात महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा सुपडासाफ झालेला आहे. सोमवारी २० मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होईल तेंव्हा आपली वाटचाल अभूतपूर्व विजयाकडे सुरू झाली आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच उज्ज्वल निकम यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले आहेत. कसाबला फाशी देऊन त्यांनी हुतात्मा जवानांचे बलिदान व्यर्थ होऊ दिले नाही. पण, इंडीया आघाडीला कसाबच्या बदनामीची चिंता आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयानेही मान्य केले, पण हे मान्य करायला तयार नाहीत. ज्यांनी तुमच्याकरिता बलिदान दिले, त्या हुतात्म्यांना तरी बदनाम करू नका. त्यामुळे सर्वसामान्य मतदारांनी हे ठरवण्याची वेळ आली आहे, की तुम्ही देशभक्तांच्या पाठीशी उभे राहणार आहात की, देशद्रोह्यांच्या? असा सवालही फडणवीसांनी यावेळी केला.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news