

मुंबई: प्रत्येक सुखदुःखात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असलेले एकमेव नेतृत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होय, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांनी येथे केले.
पीक कर्जमुक्तीचा निर्णय घेतल्याबद्दल भाजप किसान मोर्चाने राज्यातील शेतकऱ्यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार केला. त्या प्रसंगी रविंद्र चव्हाण म्हणाले, कोणतीही राजकीय निवडणूक डोळ्यांसमोर नसताना मुख्यमंत्र्यांनी हा कर्जमुक्तीचा निर्णय घेतला, कारण शेतकऱ्यांचे हित हा आमच्यासाठी राजकारणाचा विषय नाही. अनेकांना वाटत होतं सरकार कर्जमाफी करणार नाही. आपण आंदोलने करू... पण हे महायुतीचे सरकार आहे, शेतकऱ्यांच्या देवाभाऊचे सरकार आहे" असंही चव्हाण म्हणाले.
शेतरस्ते आणि पाणंद रस्ते, जलयुक्त शिवार अभियान, शेतीला मिळालेली AI आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड, कृषी पंपांना भर दिवसा मोफत वीज अशा फडणवीस यांच्या नेतृत्वात घेण्यात आलेल्या विविध निर्णय आणि योजनांचा यावेळी रविंद्र चव्हाण यांनी मागोवा घेतला. सरकारच्या कामगिरीतून शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या सोहळ्यात भाजप प्रदेश सरचिटणीस आ. संजय कुटे यांनी तमाम शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. उपस्थित शेतकऱ्यांनी हात उंचावून देवाभाऊ यांच्या नावाने जयघोष केला.
या सोहळ्याला कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस खा. अनिल बोंडे, आ. रणधीर सावरकर, भाजप गटनेते आ. प्रवीण दरेकर, भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. संजय कुटे, भाजपा महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा आ. चित्रा वाघ, भाजपा महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चा अध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांच्यासह अनेक आमदार, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.