

मुंबई: गोरेगाव येथील नेस्को येथील संगीत कार्यक्रमानंतर दोन एमबीए विद्यार्थ्यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर उघडकीस आलेल्या गाजलेल्या ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांनी १४ आरोपींविरुद्ध सुमारे ३,५०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले असले, तरी तपास अद्याप संपलेला नाही. आरोपपत्रानंतर आता तपासाचा भर अमली पदार्थांच्या पुरवठा साखळी, आर्थिक व्यवहार, डिजिटल पुरावे आणि फॉरेन्सिक अहवालांवर केंद्रित करण्यात आला आहे.
या प्रकरणातील जप्त मोबाइल फोन, लॅपटॉप, इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधील डेटा, सोशल मीडिया चॅट्स, कॉल डिटेल रेकॉर्ड यूपीआय आणि बँक व्यवहारांची छाननी सुरू आहे. या विश्लेषणातून ड्रग्ज पुरवठा साखळीतील आणखी काही व्यक्तींचा सहभाग समोर येतो का, याचा शोध घेतला जात आहे.
ड्रग्जच्या 'सप्लाय चेन'चा शोध
आरोपपत्र दाखल झाल्यानंतर तपास केवळ कार्यक्रमस्थळी अमली पदार्थ पुरवणाऱ्या पेडलर्सपुरता मर्यादित राहिलेला नाही. मुंबईत एमडी, एक्स्टसी आणि इतर सिंथेटिक ड्रग्जचा पुरवठा कोणत्या माध्यमातून झाला, त्यामागील घाऊक पुरवठादार कोण आणि त्याचे आर्थिक लाभार्थी कोण आहेत, याचाही शोध तपास यंत्रणा घेत आहे.
या प्रकरणातून शहरातील 'पार्टी ड्रग्ज' नेटवर्कचे धागेदोरे मिळण्याची शक्यता तपासली जात आहे तसेच ,आरोपींच्या बँक खात्यांतील व्यवहार, यूपीआय पेमेंट, ऑनलाइन आर्थिक देवाण-घेवाण आणि इतर आर्थिक पुरावे तपासत आहे. ड्रग्ज विक्रीतून मिळालेल्या पैशांचा मागोवा घेऊन संबंधित मालमत्तेवर कारवाई करता येईल का, याचाही अभ्यास सुरू असल्याचे समजते.
फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा
प्रकरणातील जप्त अमली पदार्थांचे नमुने आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी अहवाल तपासासाठी महत्त्वाचे मानले जात आहेत. या अहवालांतील निष्कर्षांनुसार तपासाची पुढील दिशा आणि संबंधित आरोपींविरुद्ध पुराव्यांची साखळी अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे.
तपासादरम्यान नवीन आरोपी, नवे पुरावे किंवा आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे समोर आल्यास कायद्यानुसार पूरक आरोपपत्र दाखल करता येऊ शकते. मात्र, मुंबई पोलिसांनी अद्याप पूरक आरोपपत्राबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
पुढील तपासाचा फोकस
ड्रग्ज पुरवठ्याचे मूळ नेटवर्क
एमडी व एक्स्टसी पुरवठादारांचा शोध
डिजिटल पुरावे व सोशल मीडिया चॅट्स
यूपीआय व बँक व्यवहारांचे विश्लेषण
नव्या संशयितांचा शोध आणि आवश्यक असल्यास पूरक आरोपपत्र