

कल्याण: डोंबिवलीतील शास्त्रीनगर महापालिका रुग्णालयात डॉक्टर व परिचारिकांवर झालेल्या मारहाण प्रकरणात शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना रविवारी कल्याण न्यायालयाने ३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, या प्रकरणातील पाचवी आरोपी साधना करांडे यांनाही अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले.
यापूर्वी कल्याण न्यायिक दंडाधिकारी न्यायालयाने म्हात्रे यांना जामीन मंजूर केला होता. मात्र, त्या जामिनाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती देत त्यांना पोलिसांसमोर शरण जाण्याचे आदेश दिले. त्यानुसार म्हात्रे यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले.
त्यानंतर पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीचा आदेश दिला. या प्रकरणात विष्णूनगर पोलिसांनी साधना करांडे यांना अटक केली.
उपचारास विलंब झाल्याचा आरोप करण्यात आलेल्या गर्भवती महिलेच्या त्या आई असून, वादानंतर रमेश म्हात्रे व त्यांच्या समर्थकांसह डॉक्टर आणि परिचारिकांना मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्या अटकेनंतर या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या पाच झाली आहे.
रमेश म्हात्रे यांचे वकील गणेश पाटील यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाने जामिनाला स्थगिती दिली असून या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ जुलै रोजी होणार आहे.
दरम्यान, मारहाणीत जखमी झालेल्या डॉ. सृष्टी बाविस्कर यांच्या वडिलांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले.
"देशात कायद्याचे राज्य आहे, हे या निर्णयातून पुन्हा स्पष्ट झाले. डॉक्टरांना भयमुक्त वातावरणात काम करता आले पाहिजे," असे महेंद्र बाविस्कर यांनी सांगितले. शास्त्रीनगर महापालिका रुग्णालयात गर्भवती महिलेच्या उपचारास कथित विलंब झाल्याच्या आरोपावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले होते.
या घटनेनंतर डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त करत नियमित सेवा बंद ठेवून केवळ आपत्कालीन सेवा सुरू ठेवली होती.