

Monsoon Update
मान्सून आज, शनिवारी (दि. २४ मे २०२५) रोजी केरळमध्ये दाखल झाला. त्याचे सामान्यतः १ जून रोजी केरळमध्ये आगमन होते. पण यावेळी तो सामान्य तारखेच्या ८ दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने शनिवारी दिली. दरम्यान, मान्सूनने गोव्याच्या वेशीवर म्हणजे उत्तर कर्नाटकातील कारवारपर्यंत धडक दिली आहे. तसेच मान्सून पुढील २ ते ३ दिवसांत संपूर्ण गोवा आणि महाराष्ट्रातील काही भागांत पोहोचण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
मान्सूनचे यंदा सामान्य तारखेच्या ८ दिवस आधीच केरळमध्ये आगमन झाले. याआधी मान्सून २००९ साली २३ मे रोजी केरळमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर १६ वर्षांत मान्सून केरळमध्ये वेळेआधीच दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
मान्सूनने २४ मे रोजी दक्षिण अरबी समुद्राचा उर्वरित भाग, पश्चिम मध्य आणि पूर्व मध्य अरबी समुद्राचा काही भाग, संपूर्ण लक्षद्वीप भाग, केरळ, माहे, कर्नाटकचा काही भाग व्यापला आहे. पुढील २ ते ३ दिवसांत मान्सून मध्य अरबी समुद्राचा काही भाग, संपूर्ण गोवा, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशचा काही भाग, कर्नाटकचा काही भाग, तामिळनाडूचा उर्वरित भाग, पश्चिम मध्य आणि उत्तर बंगालच्या उपसागराचा काही भाग, ईशान्येकडील राज्यांच्या काही भागात आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही भागात पोहोचण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
हवामान विभागाने कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटकचा किनारी आणि दक्षिण अंतर्गत भाग आणि केरळमधील काही भागात अतिवृष्टीची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
दरम्यान, पूर्व-मध्य अरबी समुद्र आणि लगतच्या दक्षिण कोकण किनाऱ्यावरील तीव्र कमी दाबाचा पट्टा (डिप्रेशन) गेल्या काही तासांत ६ किमी प्रतितास वेगाने हळूहळू पूर्वेच्या दिशेने सरकला. आज २४ मे रोजी सकाळी ८.३० वाजता हा तीव्र कमी दाबाचा पट्टा दक्षिण कोकण किनाऱ्याजवळील याच भागात रत्नागिरीच्या उत्तर-वायव्येस सुमारे ३० किमी आणि दापोलीपासून दक्षिणेस ७० किमीवर अंतरावर सक्रिय होता, असे हवामान विभागाने सांगितले.