

Monsoon Update
नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून आज शनिवारी (२४ मे) रोजी केरळमध्ये दाखल झाला. याबाबतची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. मान्सून सामान्यतः १ जून रोजी केरळमध्ये दाखल होतो. पण यंदा त्याचे सामान्य तारखेच्या ८ दिवस आधीच केरळमध्ये आगमन झाले. याआधी २००९ मध्ये २३ मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल झाला होता. त्यानंतर १६ वर्षांत मान्सून केरळमध्ये वेळेआधीच दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
२००९- २३ मे
२०१०- ३१ मे
२०११- २९ मे
२०१२- ५ जून
२०१३ - १ जून
२०१४- ६ जून
२०१५- ५ जून
२०१६- ८ जून
२०१७- ३० मे
२०१८- २९ मे
२०१९- ८ जून
२०२०- १ जून
२०२१- ३ जून
२०२२- २९ जून
२०२३- ८ जून
२०२४- ३० मे
मान्सूनच्या आगमनाची तारीख आणि देशभरात या हंगामात पडलेल्या एकूण पावसाचा थेट संबंध नसल्याचे हवामानशास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
“केरळमध्ये मान्सूनचे लवकर अथवा उशिरा आगमन, ही गोष्ट संपूर्ण भारतातील त्याची प्रगती कशी राहील, याचे संकेत देत नाही,” असे हवामान विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले. मान्सूनवर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या बदलांसह जागतिक, प्रादेशिक आणि स्थानिक हवामान घटकांचा प्रभाव राहतो, असेही त्यांनी नमूद केले.
एप्रिल महिन्यात जाहीर केलेल्या अंदाजात, हवामान विभागाने २०२५ च्या मान्सून हंगामात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचे म्हटले होते. यंदा एल निनो परिस्थिती उद्भवणार नसल्याचेही सांगण्यात आले होते.
यंदा देशभरात सरासरीच्या १०३ टक्के पावसाता अंदाज स्कायमेट या संस्थेने वर्तवला होता. जून ते सप्टेंबर २०२५ मध्ये मान्सून समाधानकारक राहील. महाराष्ट्रातही समाधानकारक पाऊस पडेल, असेही स्कायमेटने म्हटले होते.
मान्सून २४ मे रोजी केरळमध्ये दाखल झाला. शनिवारी मान्सूनने दक्षिण अरबी समुद्राचा उर्वरित भाग, पश्चिम मध्य आणि पूर्व मध्य अरबी समुद्राचा काही भाग, संपूर्ण लक्षद्वीप भाग, केरळ, माहे, कर्नाटकचा काही भाग, मालदीवचा उर्वरित भाग आणि कोमोरिन भाग, तामिळनाडूचा अनेक भाग तसेच नैऋत्य आणि पूर्व-मध्य बंगाल उपसागराचा उर्वरित भाग, पश्चिम-मध्य आणि उत्तर बंगाल उपसागराचा काही भाग आणि मिझोरामचा काही भाग व्यापला आहे. मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक परिस्थिती असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे