

Heavy Rain Warning in Maharashtra
राज्यातील अनेक भागांत धुवाँधार पाऊस सुरु आहे. दरम्यान, पुढील ४ दिवसही पावसाचे राहणार आहेत. दक्षिण कोकण किनाऱ्यावरील पूर्वमध्य अरबी समुद्रातील कमी दाब पट्ट्याचे तीव्र कमी दाब पट्ट्यात (डिप्रेशन) रुपांतर झाले आहे. हा तीव्र कमी दाब पट्टा आज (२४ मे) रोजी सकाळी ५.३० वाजता पूर्वमध्य अरबी समुद्र आणि लगतच्या दक्षिण कोकण किनाऱ्यावर जवळ रत्नागिरीच्या वायव्येस सुमारे ४० किमी अंतरावर सक्रिय होता.
आज दुपारी हा पट्टा पूर्वेकडे सरकण्याची आणि रत्नागिरी, दापोली दरम्यान दक्षिण कोकण किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. यामुळे विशेषतः गोवा, कोकण पट्ट्यातील काही ठिकाणी आज आणि उद्या अतिवृष्टीचा शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
२४ ते २८ मे दरम्यान कोकण आणि गोवा, केरळ, कर्नाटक आणि मध्य महाराष्ट्रातील (Maharashtra Weather) बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर या भागातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. २४ आणि २ मे दरम्यान कोकण गोव्यातील काही भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. २५ मे रोजी मध्य महाराष्ट्रात, २४ ते २७ मे दरम्यान कर्नाटकचा किनारपट्टी भाग आणि २५ मे रोजी कर्नाटकातील अंतर्गत भागात अतिवृष्टीची शक्यता असल्याचे हवामान विभागाने जारी केलेल्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे.
२४ ते २५ मे दरम्यान पूर्व-मध्य अरबी समुद्र आणि लगतच्या ईशान्य अरबी समुद्रावर, कोकण, गोवा आणि दक्षिण गुजरात किनारपट्टीवर प्रतितास ६५ किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.
२४ ते २७ मे दरम्यानच्या कालावधीत पूर्व मध्य आणि लगतचा ईशान्य अरबी समुद्र, लक्षद्वीप आणि कोमोरिन क्षेत्र आणि केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरात किनारपट्टीवर समुद्र अधिक प्रमाणात खवळलेला राहील.